सेना डॉक्टर्सनी १६ हजार फुट उंचीवर जवानावर केली यशस्वी शस्त्रक्रिया

फोटो साभार हिंदुस्तान टाईम्स

पूर्व लडाखच्या एलएसीवर हाडे गोठविणारी थंडी, अतिशय वाईट हवामान याला न जुमानता लष्करी डॉक्टर्सच्या एका चमूने एका जवानावर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया यशस्वी करून विक्रम प्रस्थापित केला आहे. चीनच्या सततच्या कारवायांमुळे भारतीय सेना जवान या भागात ताठ आणि खडी ताजीम देऊन ठाम उभे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार एका जवानाला अपेंडिक्सचा त्रास होऊ लागल्यावर त्याला हेलीकॉप्टरने लेह येथे आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते मात्र हवामान इतके खराब होते की हे उड्डाण शक्य नव्हते. अखेर फॉरवर्ड सर्जरी सेंटर मधील डॉक्टर्सनी या जवानावर तेथेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि १ लेफ्ट. कर्नल, एक मेजर, एक कॅप्टन आणि अन्य तीन डॉक्टर्स अश्या ग्रुपने अतिशय खडतर परिस्थितीशी सामना करून ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.

२८ ऑक्टोबर रोजी ही शस्त्रक्रिया पार पडली. दरम्यान अनेक अडचणी आल्या मात्र सर्व अडचणी दूर करत ही शस्त्रक्रिया केली गेली. आता या जवानाची प्रकृती स्थिर आहे असे समजते. फॉरवर्ड एरिया सेना डॉक्टर्सनी अश्या परिस्थितीत केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियामधील ही एक आहे. भारतीय सेना फिल्ड हॉस्पिटल्स पूर्ण सक्रीय असून एलएसी वर तैनात असलेल्या जवानांना अतिशय कडाक्याच्या थंडीमुळे येणाऱ्या समस्यांवर येथे स्पेशल उपचार केले जातात.