मध्यस्थी : एक उत्तम व्यवसाय

middle
कोणत्याही व्यवहारामध्ये देणारा आणि घेणारा यांच्या मध्ये सरळ व्यवहार होत नाही. हा व्यवहार दोघांच्याही मनाप्रमाणे व्हावा यासाठी मध्यस्थी करणारा एक मध्यस्थ हवा असतो. कारण दोघांनाही आपल्या अपेक्षा प्रत्येक वेळी थेट बोलून व्यक्त करता येत नाहीत. काही वेळा भिडस्तपणा आडवा येतो तर काही वेळा काही गोष्टी स्पष्टपणे बोलाव्या लागतात, त्या बोलता येत नाहीत. ही सारी कामे मध्यस्थ मंडळी करत असतात आणि कोणत्याही क्षेत्रात मध्यस्थीचा व्यवसाय करण्यास भरपूर संधी असते. प्रत्येक व्यवसायाचे काही नियम ठरलेले असतात, काही पायंडे पडलेले असतात. घर विकत घेणे, लग्न करणे, जमिनी विकत घेणे, वाहन विकत घेणे किंवा विकणे तसेच गुरांची खरेदी-विक्री करणे असे व्यवहार सामान्य माणसाच्या आयुष्यात नेहमी होत नाहीत. कोणीही आपल्या आयुष्यात असा व्यवहार एकदाच करतो, त्यामुळे त्याला ते पायंडे नियम, माहीत नसतात. म्हणून अशा व्यवहारांमध्ये हे सारे नियम आणि पायंडे माहीत असणारा मध्यस्थ गरजेचा असतो. असा मध्यस्थ पैसे कमावतो, परंतु त्याच्यामुळे व्यवहारातल्या दोन्ही बाजूंच्या व्यक्तींना समाधान प्राप्त होत असते. विशेष म्हणजे मध्यस्थी करण्याचा असा व्यवसाय हा बिनभांडवली व्यवसाय असतो. त्या व्यवहाराची त्या व्यक्तीला असलेली माहिती हेच त्याचे भांडवल असते.

जनावरांच्या बाजारांमध्ये असे मध्यस्थ किंवा दलाल मोठ्या प्रमाणावर दिसतात. कारण ज्याला जनावर विकायचे असते तो जनावराजवळ उभा असतो आणि येणारा-जाणार्‍यांपैकी ज्याची नजर त्या जनावरावर पडते तोच त्या जनावराविषयी चौकशी करतो. काही ठिकाणचे जनावरांचे बाजार एवढे मोठे असतात की त्यात शेकडो जनावरे विक्रीस आलेली असतात. त्या एवढ्या मोठ्या बाजारात जनावरांच्या किंमती साधारण किती आहेत याचा अदमास त्या व्यक्तीला आपल्या जनावराजवळ उभा राहिल्याने येत नाही. हा अंदाज दलालाला असतो. कारण त्याचे जनावर विक्रीला आलेले नसते आणि तो बाजारभर फिरत असतो. कोणत्या प्रकारच्या जनावराचे गिर्‍हाईक कोठे आहे आणि जनावरांच्या अंदाजे किंमती काय आहेत याच्याशी तो अवगत असतो. जनावर विकणारा आणि विकत घेणारा या दोघांशीही तो या माहितीच्या आधारावर योग्य ती चर्चा करू शकतो आणि तो प्रामाणिकपणे हे करत असेल तर जनावर विकणार्‍याला जनावराची योग्य किंमत आल्याचे समाधान मिळते आणि जनावर विकत घेणार्‍याला माफक किंमतीत जनावर मिळाल्याचे समाधान मिळते. या व्यवहाराबद्दल उभय बाजूंनी त्याला काही पैसे द्यावे लागले तर दोघांनाही वाईट वाटण्याचे कारण नसते.

अशाच प्रकारची दलाली जमिनी, घरे, वाहने यांच्याही खरेदी-विक्रीमध्ये केली जाते. मुंबईसारख्या शहरामध्ये लोकांना भाड्याने घरे मिळवून देणारे दलाल या कामातून ब्रोकरेज मिळवतात. ब्रोकरेज हे दलालीचे दुसरे नाव आहे. घरे भाड्याने घेणार्‍याला घराची गरज असते आणि अशा दलालाकडे घरांची यादी असते. तो त्याच व्यवसायात असल्यामुळे अशा घरांची यादी जमा करणे हाच त्याचा व्यवसाय असतो. त्यामुळे त्याची डायरी भरलेली असते. घर भाड्याने घेणार्‍या व्यक्तीला भाड्याने घर देणार्‍यांची एवढी यादी जमा करणे मुश्किलच असते. म्हणून त्याला ब्रोकर गरजेचा वाटतो. असा ब्रोकर केवळ घरच मिळवून देतो असे नाही तर भाड्याने घर घेऊ इच्छिणार्‍याच्या सोयीचे आणि परवडेल असे घर तो मिळवून देतो. कारण त्याच्याकडे असलेल्या यादीत सगळ्या प्रकारची घरे नोंदलेली असतात. या व्यवहारामध्ये घराच्या मालकाला सुद्धा योग्य तो भाडेकरू मिळाल्याचे समाधान मिळते आणि घर घेणार्‍या व्यक्तीला आपल्याला हवे तसे घर मिळाल्याचे समाधान प्राप्त होते. दोघांच्या मध्ये काम करणारा ब्रोकर पैसे मिळवतो, परंतु हे पैसे व्यर्थ जात नाहीत. सतत फिरून मिळवलेली घरांची यादी हेच त्याचे भांडवल असते आणि प्रामाणिकपणा हा व्यवहाराचा आधार असतो.

अशाच प्रकारचा एक व्यवसाय म्हणजे वधू-वर सूचक मंडळ. घर, जमिनी आणि जनावरांचे बाजार यांच्यामध्ये दलाली करणार्‍या व्यक्तीला घराबाहेर पडावे लागते, पण वधू-वर सूचक मंडळाला घराच्या बाहेर पडण्याची सुद्धा गरज नाही. दारावर मंडळाच्या नावाची पाटी लावली की, वधू आणि वर असे उभय बाजूंचे लोक आपल्या घरी येऊन नावे नोंदवतात. नाव नोंदणीबद्दल पैसे घ्यावेत की नाही हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा विषय आहे. परंतु लग्न जमवताना इच्छुक वधू किंवा इच्छुक वर यांची नावे देण्यासाठी पैसे घेतले जातात. याही व्यवसायाला भांडवल लागत नाही. अनेक महिला आणि सेवानिवृत्त झालेले लोक हा व्यवसाय अगदी आवडीने करतात. मात्र नावे नोंदवून घेताना वय, जात, गोत्र, पोटजात आणि वधू-वरांविषयीच्या अपेक्षा यांची माहिती नोंदवून घेणे गरजेचे असते. समोर आलेला इच्छुक वर किंवा वधू हिला कोणते स्थळ योग्य ठरेल याचा अंदाज घेण्याचे कौशल्य सुद्धा असे वधू-वर सूचक मंडळ चालविणार्‍याकडे असले पाहिजे. हाही तसा बिनभांडवली धंदा आहे. परंतु हा व्यवसाय करणार्‍याचा जनसंपर्क जितका चांगला असेल आणि त्याचा स्वभाव जेवढा बोलका असेल तेवढा हा व्यवसाय चांगला करता येतो.

Leave a Comment