किंग खान झाला ५५ वर्षांचा

बॉलीवूड मधील किंग शाहरुख खान याने आज म्हणजे २ नोव्हेंबरला वयाची ५५ वर्षे पूर्ण केली आहेत. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात करोडो चाहते असलेल्या शाहरुखने कसदार अभिनयाचे दर्शन घडविणाऱ्या शेकडो भूमिका साकारल्या आहेत. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या शाहरुखची प्रेम कहाणी चांगलीच गाजलेली आहे.

शाहरुखचे शिक्षण दिल्लीत झाले असून त्याने हंसराज कॉलेज मधून पदवी मिळविली पण मास्टर्स करण्याअगोदरच तो अभिनय करण्यासाठी तो मुंबईत आला. लहानपणी त्याची दोस्त होती बॉलीवूड अभिनेत्री अमृतासिंग. पण शाहरुख १८ व्या वर्षीच गौरीकडे हृदय देऊन बसला होता. तेव्हा गौरी होती फक्त १४ वर्षाची. गौरी मुंबईत आली आणि तिच्या मागोमाग शाहरुखने मुंबई गाठली. येथे त्याने त्याकाळात फौजी, सर्कस सारख्या मालिका केल्या. सहा वर्षे प्रेम करण्यात घालविल्यावर शाहरुख गौरी २५ ऑक्टोबर १९९७ मध्ये विवाहबद्ध झाले. त्यांना तीन मुले आहेत.

शाहरुखचा पहिला चित्रपट होता दिवाना. पण खरे तर त्याने साईन केलेला पाहिला चित्रपट होता दिल आशना है. वास्तविक या चित्रपटाचे शुटींग प्रथम पूर्ण झाले होते पण दिवाना अगोदर रिलीज झाला. शाहरुख चित्रपटाच्या मानधनापोटी कोट्यवधी रुपये घेतो आणि जाहिराती मधून सुद्धा चिक्कार पैसे कमावतो. मुंबई, दुबई, युके मध्ये त्याच्या मालमत्ता आहेत. मात्र त्यातील सर्वात मौल्यवान आहे तो त्याचा मन्नत बंगला. हा बंगला त्याने १३.२ कोटी रुपयाने खरेदी केला होता आणि आज त्याची किंमत आहे २०० कोटी.