इडली फॅक्टरीने केला इडलीचा मेकओव्हर

bars
शतकानुशतके गरमागरम, पांढरी शुभ्र इडली हा न्याहरीचा पदार्थ कोणत्याही बदलाविना लोकप्रियतेचा उच्चांक राखून आहे. मात्र चेन्नईमधील दोन उद्योजकांनी या इडलीचा मेकओव्हर करण्याचे आव्हानात्मक काम केले असून त्यांची इडली फॅक्टरी अल्पावधीत चांगलीच लोकप्रिय झाली आहे. आर.यू.श्रीनिवासन आणि राजन रामस्वामी यांनी इडली क्विक आणि हेल्दी स्नॅकच नव्हे तर छोट्याशा पर्समध्येही सहज नेता येईल अशा पॅकमध्ये उपलब्ध करून दिली आहे.

या इडलीची खास बात म्हणजे २४ तास ती नरम राहतेच पण पारंपारिक गोल आकाराच्या ऐवजी ती बार स्वरूपात आहे. शिवाय भाजलेली डाळ, मिरची आणि तीळतेल यांच्या मिश्रणात ती घोळवलेली आहे आणि ब्राईट यलो रॅपर मध्ये पॅक केली गेली आहे. गेल्या चार महिन्यांपासून चेन्नईत उपलब्ध झालेली ही इडली अतिशय लोकप्रिय बनली असून अन्य शहरातून तिची मागणी वाढते आहे आणि ही मागणी पुरी करण्यास उत्पादकांची चांगलीच धावपळ होत आहे.

श्रीनिवासन यांनी २० वर्षे आयटी सेवा क्षेत्रात काम केल्यानंतर राजीनामा देऊन राजन यांच्या सहकार्याने हे उत्पादन तयार केले. त्यासाठी तांदूळ आणि डाळींची वेगवेगळी ३०० मिश्रणे त्यांनी ट्राय केली. मात्र अखेरी आई, आजी बनवित असलेली रेसिपीच उत्तम असल्याचे त्यांना आढळले. प्रवासादरम्यान शाकाहारी लोकांचे होत असलेले हाल लक्षात घेऊन त्यांनी प्रथम प्रवासी हेच त्यांचे ग्राहक मानले. इडली तयार करताना डाळ मिरची मिश्रणात घोळून तीळ तेल घातल्यामुळे इडलीचे शेल्फ लाईफ वाढले. यात कोणतीही प्रिझरर्व्हेटिव्ह, कृत्रिम रंग नाहीत तसेच ती तळलेली नाही. यामुळे लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत ती हेल्दी फूड म्हणून लोकप्रिय ठरली आहे.

दक्षिणेकडील भागात घरोघरी जवळजवळ दररोज इडली बनते. तरीही पॅक इडली बाजारात आणणे आणि ती खपविणे हे आव्हान होते. त्यामुळे तिचा आकार बदलण्याचा आणि अतिशय सुटसुटीत पॅकमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला गेला असेही श्रीनिवासन सांगतात आरोग्यपूर्ण अशी ही इडली सहाच्या पॅकमध्ये आहे. तसेच दहाच्या पॅकमध्ये शुद्ध तुपातली, मिरी व नटस घातलेली कांचीवरम इडलीही ते बाजारात आणत आहेत.

Leave a Comment