उदयनराजे भोसले -रामराजे नाईक निंबाळकरांची ग्रेट भेट!


सातारा : गेल्या कित्येक महिन्यांपासून साताऱ्यातील रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले या दोन्ही राजघराण्यांमधील वाद टोकाला गेल्याचे चित्र संपूर्ण साताऱ्यासह महाराष्ट्राने पाहिले आहे. तर हा वाद लोकसभा-विधानसभेच्या कालावधीत खूप विकोपाला गेला होता. त्यात तर उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात फलटण येथे रामराजे यांच्या निवासस्थानी जाऊन राडाही घातला होता. पोलीस ठाण्यात तशी नोंदही आहे. त्याचबरोबर राजकीय वर्तुळात दोन राजघराण्यातील संघर्षामुळे मोठी चर्चा सुरू होती.

अनेकांनी भाजपची वाट उदयनराजे यांच्यामुळेच स्वीकारली आणि राष्ट्रवादीला रामराम ठोकला अशी चर्चा मोठ्या प्रमाणात रंगताना पाहायला मिळाली. पण काल या दोन राजांमधील संघर्ष मिटला असे चित्र दिसले. जिल्हा शासकीय निवासस्थानी म्हणजे सर्किट हाऊसमध्ये रामराजे नाईक-निंबाळकर हे बसलेले असताना त्या ठिकाणी उदयनराजे भोसले हे अचानक आले आणि रामराजेंना हात जोडून नमस्कार केला.

त्यांना हात जोडून रामराजे यांनीही नमस्कार करून बसण्याची विनंती केली. दोघेही समोरासमोर बसल्यानंतर मात्र प्रशासन यंत्रणेसोबत पोलीस खात्याचीही भांबेरी उडाली. नुसती भांबेरी उडाली नाही तर राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली. कार्यकर्ते देखील सैरभेर झाले. गेल्या काही महिन्यांपासून जे दोन राजे एकमेकांकडे कट्टर विरोधक म्हणून पाहत होते ते दोन राजे समोरासमोर बसून गप्पा मारताना दिसले. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे जरी समजू शकले नसले, तरी या दोघांची झालेली ही भेट म्हणजे यांच्यातील वाद संपुष्टात आला असे म्हणायला हरकत नाही.

दोघांच्या दिलखुलास गप्पानंतर कोरोना विषयावरही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. रामराजे यांनी जाताना त्यांना कोरोनाच्या अनुषंगाने काळजी घेण्याचा सल्ला दिला. उदयनराजे भोसले यांची झालेली ही बैठक योगायोग होता की अजून काही हे मात्र समजू शकले नाही. तरी एकमेकांचे राजकीय आस्तित्व संपवू पाहणारे हे दोन दिग्गज राजे मात्र एकमेकांच्या समोर बसून गप्पा मारताना पाहिल्यावर सातारकरांना मोठा दिलासा मिळाला.