स्वदेशी कोरोना लसीबाबत भारत बायोटेक दिली महत्त्वाची माहिती


नवी दिल्ली : देशावर कोरोनाचे दुष्ट संकट ओढावलेले असतानाच या संकटावर मात करणारी स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार याकडे सर्व देशवासियांचे डोळे लागलेले आहेत. त्यातच आता भारत बायोटेक कंपनीतील अधिकाऱ्याने या लसीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला नुकतीच परवानगी मिळाल्यानंतर ही सर्वात महत्त्वपूर्ण माहिती असल्याचे समोर येत आहे.

भारतातील नागरिकांसाठी 2021च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत स्वदेशी लस उपलब्ध असेल, अशी माहिती भारत बायोटेक कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली आहे. कंपनीचे लक्ष्य सध्या देशभरातील लसीच्या चाचण्यांचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यावर आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांच्या संयुक्त विद्यमाने ही लस भारत बायोटेकने तयार केली. कोवॅक्सिन SARS-Cov-2 ची इनअॅक्टिव्हेटेड स्‍ट्रेनमधून तयार केली आहे.

शेवटच्या टप्प्यातील चाचणीचा डेटा हा सुरक्षित आणि यशस्वीरित्या पार पडल्यानंतर ही लस बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही लस नागरिकांना 2021च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत उपलब्ध होऊ शकेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या लसीची चाचणी साधारण 14 राज्यांमध्ये 24 ते 25 वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये सुरू आहे. प्रत्येक रुग्णालयात जवळपास 2000 स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी सध्या सुरू आहे. या लसीचे उत्पादन केल्यानंतर सरकारी रुग्णालयांमध्ये तसेच सरकारी रुग्णालयांना औषध पुरवणाऱ्या दुकानांना किंवा कंपन्यांना या लसीचा पुरवठा करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. या लसीची किंमत किती असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.