काँग्रेस नेत्याचा भाजपवर गंभीर आरोप; ५० कोटी आणि मंत्रीपदाची ऑफर


भोपाळ – विधानसभेच्या २८ जागांसाठी मध्य प्रदेशात पोटनिवडणुका होत असून या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रचार शिगेला पोहचला आहे. त्याचबरोबर नेत्यांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. यातच आता भाजपवर गंभीर आरोप काँग्रेसच्या नेत्याने केले आहेत. भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर कमलनाथ सरकारमध्ये मंत्री राहलेले आमदार उमंग सिंघार यांनी आरोप केले आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंत्रीपदाची आणि ५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट सिंघार यांनी केला आहे.

मध्य प्रदेशच्या राजकारणात सिंघार यांच्या या आरोपानंतर खळबळ उडाली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांना लक्ष करत काँग्रेसने टीका केली आहे. सिंघार यांच्या आरोपांना ज्योतिरादित्य शिंदे यांनी उत्तर द्यावे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले. ज्योतिरादित्य शिंदे यांचे उमंग सिंघार हे खास होते. यामुळे या आरोपांवर ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्टीकरण द्यावे. उमग सिंघार खरे बोलत आहेत की खोटे हे ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्ट करायला हवे, असे दिग्विजय सिंह बदनावरमधील सभेत म्हणाले आहेत. दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत शिंदे यांना याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असे म्हटले आहे.