पेईंग गेस्ट

paying-guest
बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या समाजापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. भारतातली अनेक तरुण मुले उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊन तिथेच कायम रहायला लागली आहेत. हैदराबाद, पुणे, मुंबई अशा देशातल्या मोठ्या शहरांमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबातील दर एक-दोन घराआड एका घरातला मुलगा किंवा मुलगी परदेशात वास्तव्याला असल्याचे दिसते. कुटुंब नियोजनाचा बराच प्रसार झाला असल्यामुळे आधीच तर मुले कमी आहेत, त्यातच आहेत ती कमी मुले सुद्धा परदेशात जाऊन कायम झाली की, आई-वडील वृद्धावस्थेमध्ये एकाकी जीवन कंठायला लागतात आणि एकाकीपणा हा किती मोठा शाप आहे हे त्यांना जाणवायला लागते. यातल्या प्रत्येकाचीच आर्थिक परिस्थिती फार चांगली आहे असे नाही. काही लोकांना त्यांची परदेशातली मुले पैसे पाठवतात आणि त्यावर बर्‍यापैकी गुजराण होते. परंतु काही लोकांना पैशाची चणचण सुद्धा जाणवते. उठून परदेशात जाऊन मुलाकडे राहणे त्यांना अगदीच अशक्य आहे असे नाही, परंतु ज्या देशात आणि गावात आपले उभे आयुष्य गेले त्याच गावात मन रमते. त्यामुळे मुलांकडे जाऊन राहणे सुद्धा या लोकांना मानवत नाही. परिणामी भारतातले एकाकी जीवन असह्य होऊन जाते.

वास्तविक पाहता यातले काही वृद्ध लोक ज्येष्ठ नागरिक संघात किंवा क्लबमध्ये जाऊन मन रमविण्याचा प्रयत्न करतात, पण सगळ्यांनाच ते दिवसभर शक्य होत नाही. अशा लोकांसाठी मी एक उपाय सुचवत आहे. त्यामध्ये त्यांचा आर्थिक फायदाही होणार आहे आणि एकाकीपणाच्या झळा थोड्या सुसह्य होणार आहेत. हा उपाय म्हणजे मोठ्या शहरात ज्या ठिकाणी घराच्या आसपास वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा अशाच प्रकारच्या उच्च शिक्षण देणार्‍या संस्था असतील त्या घरांमध्ये अशा महाविद्यालयातल्या मुलांना पेईंग गेस्ट म्हणून ठेवून घेणे. अशा शिक्षण संस्थांत शिक्षण घेणार्‍या सगळ्याच मुला-मुलींना वसतिगृहाची सोय उपलब्ध होत नाही. अशा मुलांना अनेक पर्याय विचारात घ्यावे लागतात. अशी मुले किंवा मुली एखादा फ्लॅट भाड्याने घेऊन त्यात राहतात. परंतु अशा फ्लॅटमध्ये सगळ्या सोयी नसतात. त्यामुळे त्यांचे खाण्या-पिण्याचे बरेच हाल होतात. एकाकी आयुष्य कंठणार्‍या वृद्ध दांपत्यांनी अशा मुलांना किंवा मुलींना आपल्या घरात पेईंग गेस्ट म्हणून ठेवून घेतले तर त्या मुलांची चांगली सोय होऊ शकते. कारण घर म्हटल्यानंतर स्वयंपाकाच्या सोयी चांगल्या असतात आणि सर्वसाधारणपणे चांगल्या कुटुंबात जसे जेवण, नाष्टा मिळायला पाहिजे तो अशा घरात मिळू शकतो.

कारण त्या घरात एक कुटुंब आधी रहात असते. अशा कुटुंबात राहणार्‍या पेईंग गेस्ट मुला-मुलींचे पालक सुद्धा अशा घरात मुलगी रहात असेल तर निश्‍चिंत असतात. कारण मुलांवर आणि मुुलींवर कोणाचे तरी लक्ष आहे अशी खात्री त्यांना वाटत असते. आजकाल पेईंग गेस्ट म्हणून राहणारी मुले आणि मुली, विशेषत: मुली चांगले पैसे देऊन राहतात आणि जेवणाची घरगुती सोय होत असेल तर चार पैसे जास्त द्यायला तयार असतात. अशा वृद्ध दांपत्यांनी आपल्या घरातली एक खोली अशा दोन-तीन मुलींसाठी उपलब्ध करून दिली तर त्या मुली किंवा मुले असतील मुले तिथे चांगले राहतात. घरात तसे वृद्ध आजी-आजोबा दोघेच असल्यामुळे मुला-मुलींची कॉलेजमध्ये जाण्याची घाईची वेळ आणि या यजमान आजी-आजोबांची वेळ क्रॉस होण्याची शक्यता नसते. बाथरुमसारख्या सोयी दोघांनाही एकात वापरण्यात अडचण येत नाही. अशा पेईंग गेस्ट मुले-मुली ठेवून घेऊन स्वयंपाकाला एखादी बाई लावून दिली तर पेईंग गेस्टची जेवणाची उत्तम सोय होऊन जाते आणि त्याच सोयीमध्ये आजोबा-आजींचेही नाष्टा, जेवण सारे होऊन जाते.

या व्यवस्थेमध्ये आजोबा-आजींना कसलाही आर्थिक ताण जाणवण्याचा प्रश्‍नच येत नाही. कारण राहणारी मुले त्यांना चांगले पैसे देत असतात. कामाचेही प्रेशर येत नाही. कारण कामवाली बाई सारे काही करू शकते. उलट मुलांचे पैसे मिळत असल्यामुळे अशा बाईला चार पैसे जास्त दिले तरी त्याचा भार जाणवत नाही. या व्यवस्थेमध्ये पैसे तर चांगले मिळतातच. ज्याला म्हातारपणी पैसे कमविण्याची ददात असते त्यांनी या व्यवस्थेकडे व्यवसाय म्हणून बघायला हरकत नाही. कारण त्यातून पैसा मिळतो आणि स्वत:ला त्यासाठी फार काही करावे लागत नाही. सार्‍या गोष्टी करून घ्यावे लागतात. फक्त एखादी खोली मोकळी करून द्यायची असते. ज्या लोकांना पैशाची ददात नाही त्यांच्या दृष्टीने या व्यवस्थेतून मिळणारा पैसा गौण आहे. पण दोन तीन मुले किंवा मुली घरात वावरत राहतात आणि त्यामुळे वृद्धावस्थेत आलेला एकाकीपणा थोडा सुसह्य होतो. खरे म्हणजे आपल्या स्वत:च्या नातवंडांचा घरातला किलबिलाट आणि या पेईंग गेस्टचा चिवचिवाट यात बराच फरक आहे हे मान्य. परंतु स्वत:ची मुले दूर रहात असतील तर या परक्या मुला-मुलींना जीव लावून सुद्धा आपण आपले एकाकीपणाचे दु:ख दूर करू शकतो. एकंदरीत पेईंग गेस्ट ही व्यवस्था किंवा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्याही उपकारक ठरू शकते.

Leave a Comment