जुन्या प्रश्‍नपत्रिका उपयुक्त

question-paper
स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यासक्रम शालेय अभ्यासक्रमासारखा ठरलेला नसतो. त्यामुळे अशा परीक्षांची तयारी करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. परीक्षेत नेमके काय विचारले जाईल आणि कसे विचारले जाईल याचा नेमका अंदाज करता येत नाही. या अडचणीवर मात करण्यासाठी तशा स्पर्धा परीक्षांचे जुने पेपर्स म्हणजे प्रश्‍नपत्रिका मिळवाव्यात. अशा जुन्या प्रश्‍नपत्रिका समोर ठेवल्या म्हणजे परीक्षेत नेमके काय आणि कसे प्रश्‍न विचारले जातील याचा बराच अंदाज येतो आणि परीक्षेची तयारी बरीच सोपी जाते. सध्या इंटरनेटवरून बर्‍याच स्पर्धा परीक्षांच्या जुन्या प्रश्‍नपत्रिका मिळायला लागल्या आहेत. अशा प्रश्‍नपत्रिका वाचताना त्यापासून नेमका काय बोध घ्यावा हे सुद्धा तारतम्याने समजून घ्यावे लागते. कारण त्यातून कोणते प्रश्‍न येतील याचा अंदाज घेण्यापेक्षा कोणत्या क्षमता तपासणारे प्रश्‍न येतील हे समजून घेतले तर त्यांचा चांगला उपयोग होतो.

एकदा आपल्याला समजले की, गेल्या वर्षीच्या प्रश्‍नपत्रिकेत ऍप्लिकेशन ऑङ्ग माईंड ही क्षमता तपासणारे प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर विचारले गेले आहेत. तेव्हा आपण ही क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करावा आणि तिच्याशी संबंधित प्रश्‍न अधिक सोडवावेत. काही विशिष्ट परीक्षांचे पेपर सोपे असतात, तर काहींचे अवघड असतात. तेव्हा त्या त्या प्रकारच्या प्रश्‍नांचा सराव करणे गरजेचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये सरावाला काही पर्याय नाही. मात्र आपण घरी बसून सराव करू म्हटले तर त्या सरावाला खूप मर्यादा येतात. म्हणून संबंधित परीक्षांसाठी तयारी करून घेणार्‍या कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घ्यावा.

अशा कोचिंग क्लासमध्ये अनेक प्रकारच्या पुस्तकातून बरेच प्रश्‍न सोडवून घेतले जात असतात. ते प्रश्‍न आपल्याला घरी बसून प्राप्त होऊ शकत नाहीत. ते कोचिंग क्लासमध्ये प्राप्तही होतात आणि तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली ते सोडवूनही घेतले जातात. ते प्रश्‍न सोडविण्याची एक युक्ती असते आणि ती युक्ती कोचिंग क्लासमध्ये आपल्याला शिकवली जाते. तेव्हा घरी तयारी करणे तर चांगले असतेच, परंतु त्यापेक्षा कोचिंग क्लास चांगला असतो. घरचा आणि कोचिंग क्लासचा अभ्यास झाला की, रिव्हिजन करावी हे खरे, पण तिचा सुद्धा अतिरेक होता कामा नये. परीक्षेला जाताना उगाच रिव्हिजन करत बसू नये. मन शांत ठेवून परीक्षेला जावे.

Leave a Comment