उच्च रक्तदाबासाठी आहार

blood-pressure
उच्च रक्तदाब हा एक असा आजार आहे की ज्यात रक्तवाहिन्यांतून रक्त वेगाने धावायला लागते. हा वेग आणि त्यामुळे येणारा रक्तवाहिन्यांवरील दबाव मोजला जातो. तुमचा हा रक्तदाब १४०/९० एवढा किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुमच्यावर उपचार करण्याची गरज आहे असे समजा. हा रक्तदाब नियंत्रणात आला की, १२०/८० असा होतो. जादा काम करणे आणि उच्च रक्तदाब यातून हृदयविकार बळावतो. सध्या जीवन पद्धतीच बदलून गेली असल्यामुळे उच्च रक्तदाब फार सामान्य झाला आहे.

त्यावर औषधोपचार आहेतच परंतु जीवन पद्धती बदलणे आणि योग्य आहार घेणे याही माध्यमांतून हा रक्तदाब नियंत्रणात आणता येतो. द्विदल धान्ये, फळे, भाज्या आणि चरबीचे प्रमाण कमी असणारे पदार्थ खाल्ले तर उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यास मदत होते. खालील प्रकारचे अन्न खाण्याची शिफारस त्यासाठी केली जाते.

दूध – दुधामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो, कारण दुधात कॅल्शियम आणि ड जीवनसत्व मुबलक असते. परंतु दुधातील चरबी ही घातक असते. म्हणून चरबी काढलेले दूध प्यावे. पालक – पालक ही पालेभाजी फारच गुणकारी असते. हिरवी आणि फायबरने युक्त अशी ही भाजी आहे. हृदय बळकट होण्यासाठी आवश्यक असलेली पोषणद्रव्ये पालकात असतात. पालकाच्या भाजीतील पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फोलेट ही पोषणद्रव्ये हृदयविकारावर गुणकारी असतात.

बटाटे – बटाट्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम विपुल असते, शिवाय फायबरचे प्रमाण भरपूर असते. पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा उपयोग रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास होतो. शेंगवर्गीय भाज्या – शेंगवर्गीय भाज्यांना पोषण द्रव्यांचे पॉवर हाऊस म्हणतात. त्यामुळे आपल्या जेवणामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या शेंगवर्गीय भाज्या असाव्यात. त्यांच्यात विद्राव्य फायबर, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते जे रक्तदाबावर तर गुणकारी असतेच पण सर्वसाधारण प्रकृती सुधारण्यासाठीही ते गरजेचे असते.

केळी याही पोटॅशियमनी युक्त असतात. आपल्या शरीरामध्ये सोडियमचा घातक परिणाम रक्तदाबावर होत असतो, तो परिणाम कमी करण्याची कामगिरी केळीतील पोटॅशियम करत असते. पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टर पोटॅशियमच्या गोळ्या देतात, पण त्या तशा गोळ्या घेण्यापेक्षा केळीसारख्या फळातून पोटॅशियम मिळवलेले चांगले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment