अवघड प्रश्‍नांजवळ घोटाळू नका

career
स्पर्धा परीक्षेला जाताना कौशल्या इतकेच वेळेच्या व्यवस्थापनालाही महत्त्व असते. आपल्या हातामध्ये प्रश्‍नपत्रिका पडली की, आपल्या त्या व्यवस्थापनाला सुरूवात होत असते. काही विद्यार्थी हातात प्रश्‍नपत्रिका पडल्या की त्यावर नजर टाकतात परंतु पहिल्या नजरेत प्रश्‍नपत्रिका सोपी आहे की अवघड याचा अंदाज ते घेत असतात आणि नकारात्मक विचार करणारा विद्यार्थी प्रश्‍नपत्रिकेतल्या विद्यार्थ्यांना संभ्रमित करणार्‍या आणि अधिक कठीण प्रश्‍नावर सुरूवातीला नजर टाकत असतो. त्यातला प्रत्येक प्रश्‍न कठीणच असतो असे नाही. मात्र काही प्रश्‍नांची शब्द योजना वेगळ्या पध्दतीने केलेली असते. म्हणजे प्रश्‍न तोच असतो परंतु तो ङ्गिरवून विचारलेला असतो. अशावेळी हे विद्यार्थी आपल्या उत्तरपत्रिकेसाठी मिळालेल्या तीन तासात बराच वेळ विशेषतः सुरूवातीचा वेळ त्या ङ्गिरवून विचारलेल्या प्रश्‍नाभोवती घोटाळत राहतात आणि त्यातल्या शब्द योजनेचे इंगित शोधण्याचा प्रयत्न करण्यात वेळही घालवतात आणि आपले मनःस्थितीही खराब करून घेतात. असे करण्याऐवजी आपल्या सोपे वाटणारे आणि ज्यांची उत्तरे हमखास माहीत आहेत असे प्रश्‍न आधी हाताळावेत. म्हणजे संभ्रमामुळे डोके आऊट होण्याचे टळते शिवाय मिळालेल्या वेळेचा सदुपयोग होऊन काही प्रश्‍न हातावेगळे होतात आणि डोक्यावरचे टेंशन कमी होते.

दरम्यानच्या काळात आपल्या विचाराची प्रक्रिया सुरू असते आणि थोड्या वेळाने आपोआपच त्या ङ्गिरवून विचारलेल्या प्रश्‍नाचा अर्थ साकार झालेला असतो. टेंशन कमी झाल्यामुळेही हे शक्य होत असते आणि असा त्याच्या अर्थाचा उलगडा झाला की तो प्रश्‍न सोडवायला घ्यावा. त्याच्यासाठी आता वेळही उपलब्ध असतो आणि आपण मोकळ्या मनाने उत्तरही लिहू शकतो. या पध्दतीमध्ये वेळेचेही व्यवस्थापन आहे आणि आपल्या मनःस्थितीचेही व्यवस्थापन आहे. शेवटी प्रश्‍नपत्रिका सोडविताना वेळेचे व्यवस्थापन करणे जेवढे आवश्यक असते तेवढेच मनःस्थितीचे व्यवस्थापनही आवश्यक असते. प्रश्‍नपत्रिकेवरून पाच मिनिटांत एक नजर टाकली की ताबडतोब लिहायला सुरूवात करावी. न लिहिता एकही मिनीट वाया घालवू नये तसा तो घालवला की वेळही वाया जातो आणि उरलेल्या वेळेत आपली प्रश्‍नपत्रिका सोडवून होते की नाही असा संभ्रम निर्माण होऊन मनाचा गोंधळ होतो. प्रश्‍नपत्रिका सोडविण्यासाठी अभ्यास तर आवश्यकच आहे. पण प्रश्‍नपत्रिका सोडविण्याचे व्यवस्थापनही आवश्यक आहे.

Leave a Comment