भूकंपाच्या धक्क्याने हादरले तुर्की, ग्रीस; 22 ठार तर 700 हून अधिक जखमी


इस्तांबूल – शुक्रवारी तुर्की आणि ग्रीस किनारपट्टीच्या दरम्यान एजियन समुद्रात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे आतापर्यंत २२ लोकांचा मृत्यू झाला असून ७०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. इस्तांबूलमधील इज्मीर जिल्ह्यात सेफेरिसारमध्येही सौम्य प्रमाणात त्सुनामीची लाट आली. त्याच वेळी ग्रीसच्या सामोस द्वीपकल्पात ४ लोक किरकोळ जखमी झाले.

याबाबत माहिती देताना युरोपियन-मध्यसागर भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, भूकंपाची तीव्रता सुरुवातीला ६.९ होती आणि ग्रीसच्या ईशान्य दिशेच्या सामोस बेटावर त्याचे केंद्रबिंदू होते. त्याच वेळी अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार भूकंपाची तीव्रता ७.० होती. एजियन समुद्रात १६.५ किमी खाली भूकंपाचे केंद्रस्थान होते. भूकंपाची तीव्रता ६.६ नोंदविली गेल्याचे तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.

तुर्कीच्या तिसर्‍या क्रमांकाच्या इज्मीर शहरात सर्वाधिक विनाश झाला. पश्चिम तुर्कीच्या इज्मीर प्रांतातील अनेक इमारती या शक्तिशाली भूकंपामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. ग्रीसच्या सामोसमध्येही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मध्य इज्मीरमधील एका बहुमजली इमारतीचा ढासळलेला ढाचा तुर्कीच्या माध्यमांनी दाखवला. याशिवाय बचाव कार्य करणारे जवानही तेथे तैनात करण्यात आले आहेत. मध्य इज्मीरमध्ये अनेक ठिकाणी हवेत धूर पसरल्याचे फोटोही समोर आले आहेत.

इज्मीरचे राज्यपाल यावूज सलीम कोसगार म्हणाले की, जवळपास ७० जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. चार इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. याशिवाय अनेक इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इज्मीरमध्ये ३८ रुग्णवाहिका, दोन हेलिकॉप्टर रुग्णवाहिका आणि ३५ बचाव दल कार्यरत आहेत. किमान १२ इमारतींमध्ये सध्या बचावकार्य सुरू आहे. त्याच वेळी ग्रीसमधील माध्यमांनी सांगितले की, सामोस व इतर द्वीपकल्पातील लोकांना भूकंपाच्या धक्क्यानंतर तातडीने घराबाहेर काढण्यात आले. याशिवाय येथे एक दरड कोसळल्याची बातमी आहे.