फ्रान्स कार्टून वादावर नरेंद्र मोदींचे भाष्य


केवडिया – गुजरातमधील केवडिया येथे एकता दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना फ्रान्स कार्टून वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. दहशतवादाच्या समर्थनार्थ उघडपणे काही लोक समोर आले आहेत. शेजारी देशातून काही दिवसांत ज्या बातम्या आल्या आहेत. ज्या प्रकारे तेथील संसदेत सत्य स्वीकारले गेले, या लोकांचा खरा चेहरा त्याने देशासमोर आणला आहे.

जगातील सर्व देशांना, सर्व सरकारांना आणि सर्व पंथांना आजच्या परिस्थितीत दहशतवादाविरोधात एकत्रित येणे अत्यंत आवश्यक आहे. मानवतेची खरी ओळख शांतता-बंधुता आणि परस्पर आदराची भावनाच आहे. कुणाचेही कल्याण दहशतवाद आणि हिंसेने कधीही होऊ शकत नाही. पंतप्रधान मोदी काँग्रेसचे नाव न घेता म्हणाले, हे लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात, हे पुलवामा हल्ल्यानंतर केल्या गेलेल्या राजकारणावरून स्पष्ट झाले आहे. तेव्हा काय-काय बोलले गेले, कशा प्रकारची वक्तव्य केली गेली, हे देश कधीही विसरू शकत नाही.

पंतप्रधान मोदी म्हणाले, अशा काही राजकीय पक्षांना मी विनंती करतो, की अशा प्रकारचे राजकारण देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि आपल्या देशाच्या संरक्षण दलाच्या मनोबलासाठी कृपा करून करू नका. आपण आपल्या स्वार्थासाठी नकळत देशविरोधी शक्तींचा हातचे खेळणे होऊन, ना देशाचे हित करू शकाल, ना आपल्या पक्षाचे, असेही मोदी म्हणाले.

त्याचबरोबर पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, नेहमीच एक गोष्ट लक्षात असू द्या, की देशहित आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्वाचे आहे. जेव्हा सर्वांच्या हिताचा विचार आपण करू तेव्हा आपलीही प्रगती आणि उन्नती होईल. आपली विविधताच आपले अस्तित्व आहे. आपण एक असू तर असाधारण असू. पण सहकाऱ्यांनो, हेही लक्षात असू द्या, की भारताची ही एकतेची ताकद दुसऱ्यांना नेहमीच खटकत असते.