जितेंद्र आव्हाडांचे आयुक्तांना आव्हान; माजी आमदाराचे अनाधिकृत क्लब अन् हॉटेल तोडून दाखवा


मीरारोड – मीरारोड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आयुक्त डॉ. विजय राठोड तुम्ही खूप प्रामाणिक व कर्तव्य कठोर असाल आणि तुमच्यात हिम्मत असेल तर माजी आमदाराचा क्लब व हॉटेल तोडून दाखवा, आमच्या कार्यकर्त्याचे हॉटेल अनधिकृत म्हणून कोणाला खुश करण्यासाठी तीन वेळा तोडले. १२४ अनधिकृत हॉटेलांची यादी मी जाहीर करतो, त्यातील २४ हॉटेल तरी तोडायची तरी हिंमत दाखवा, असे थेट आव्हान दिले.

एका व्यक्तीच्या किंवा एका पक्षाच्या मालकीचे मीरा भाईंदर शहर हे नाही आहे. आव्हाड माजी आमदार नरेंद्र मेहतांचे नाव न घेता म्हणाले की, विधानसभेत येथील माजी आमदाराच्या विरोधात सर्वात जास्त मोठ्याने आवाज मी उठवला. आयुक्तांना मी जाहीरपणे सांगतो, माजी आमदाराच्या ७११ क्लब, सी एन रॉक हॉटेलवर कारवाई करा, तुम्ही खूप प्रामाणिक आहात आणि कर्तव्य कठोर आहात, तर ती बांधकामे तोडा. परंतु त्यावर कारवाई करण्याची आणि बोलण्याची कोणाची हिंमत नाही. ३ वेळा आमच्या एका कार्यकर्त्याचे हॉटेल तोडले. १२४ अनधिकृत हॉटेलची यादी मी जाहीर करतो, हिंमत असेल तर त्यातील २४ तोडून दाखवावी. आयुक्त जर कोणाला खुश करण्यासाठी काम करत असतील तर गाठ आमच्याशी असल्याचा इशारा आव्हाडांनी दिला.

एका पक्षाचे असल्यासारखे पालिकेतील अधिकारी वागतात. कोण अधिकारी काय करत आहे, किती वर्ष कुठल्या पदावर बसून आहे, कशात भ्रष्टाचार झाला आहे याची संपूर्ण यादी आम्ही खिशात घेऊन फिरत असतो. आमचे काम आम्हाला करू द्या, तुम्ही तुमचे काम करा. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न झाला तर त्याचे प्रत्युत्तर दिले जाईल, वेडीवाकडी कामे आम्ही सांगणार नाही, रस्त्यावर आम्ही कार्यालये बांधणार नाही, सोसायटींची जागा आम्ही ताब्यात घेणार नसल्याचे आव्हाड म्हणाले.

शहर जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर यांनी पदाधिकाऱ्यांची संख्या सांगितली असता त्याची बेरीज करत तुम्ही सांगता तितके पदाधिकारी येथे उपस्थित नसल्यामुळे आपल्याला स्वतःला आपणच फसवायचे नाही, असे खडे बोल जितेंद्र आव्हाडांनी सुनावले. जे गेले, त्यांना कोणी पाठवले हा इतिहास आहे. पण जे राहिले त्यांच्या प्रामाणिक पणाच्या बळावर पक्ष बळकट करायचा असल्याचे ते म्हणाले.

ठाणे जिल्हाध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांनीही या मेळाव्यात नरेंद्र मेहता यांच्यावर निशाणा साधला. तत्कालीन आमदार नरेंद्र मेहतांनी गेल्या ५-७ वर्षात शहर विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास केला. त्यांना लोकांनी अद्दल घडवून घरी बसवले . पण महापालिकेतील कार्यालये आजही मेहता खासगी कार्यालयासारखी वापरत असल्याची टीका परांजपेंनी केली.