धर्मांतराबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय


नवी दिल्ली – फक्त विवाह करण्यासाठी धर्मातर करणे वैध नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबाद न्यायालयाने देत दोन वेगळ्या धर्माच्या दांपत्याची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. संबधित न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर त्यांचे म्हणणे मांडण्यासाही त्यांना न्यायालयाने सांगितले आहे.

या दाम्पत्याने ही याचिका आपल्या वैवाहिक जीवनात कुटुंबियांकडून होणारा हस्तक्षेप रोखण्यासाठी दाखल केली होती. या दांपत्यातील एक याचिकाकर्ता हिंदू आहे, तर दुसरा मुस्लीम आहे. 29 जून 2020 रोजी मुलीने हिंदू धर्म स्वीकारला होता. त्यानंतर 31 जुलैला एक महिन्याने तिने विवाह केला. या नोंदीवरून फक्त विवाहासाठी हे धर्मांतर करण्यात आल्याचे स्पष्ट होते. न्यायालयाने फक्त विवाहासाठी करण्यात येणारे धर्मांतर वैध नसल्याचे सांगत याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

न्यायालयाने याबाबतचा निकाल देताना नूरजहाँ बेगम प्रकरणाच्या सुनावणीचा हवाला दिला. धर्मांतर फक्त विवाहासाठी करणे वैध नसल्याचे स्पष्ट केले आहे. हिंदू मुलीने त्या प्रकरणात धर्मांतर करून मुस्लीम तरुणाशी विवाह केला होता. हिंदू मुलगी धर्मातर करून मुस्लीम तरुणाशी लग्न करू शकते काय आणि हा विवाह वैध ठरतो काय याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर न्यायालयाने हा निकाल दिला होता.

इस्लाम किंवा कोणत्याही धर्माबाबत माहिती नसताना तसेच त्या धर्मावर विश्वास आणि आस्था नसताना धर्मांतर करणे योग्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. इस्लामलाही असे धर्मांतर करणे मान्य नाही आणि ते इस्लामविरोधी असल्याचे न्यायालयाने म्हटल्यामुळे फक्त विवाहासाठी धर्मांतर करणे वैध नसल्याचे सांगत न्यायालयाने या याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. न्यायाधीश एम.सी. त्रिपाठी यांच्या पीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.