माजी मुख्यमंत्र्यांचा आजी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप


मुंबई – पुन्हा एकदा शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. परभणीच्या जाहीर सभेत खुद्द माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. काँग्रेसच्या महापालिकांना महाविकास आघाडीच्य सरकारमध्ये निधी मिळत नसल्याची तक्रार अशोक चव्हाणांनी मांडल्यामुळे अद्यापही महाविकास आघाडीत धुसफूस कायम असल्याचे समोर आले आहे.

अशोक चव्हाण याबाबत म्हणाले की, काँग्रेसच्या महानगरपालिकेला पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या, नांदेडलाही पैसे मिळाले नाहीत, मुख्यमंत्र्यांना २-३ वेळा आम्ही सांगितले, तीन पक्षांचे सरकार असताना आमच्याही महापालिकेला निधी मिळाला पाहिजे. आम्हालाही ताकद मिळाली पाहिजे, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली

तसेच भाजपचे सरकार निवडणुकीनंतर येऊ नये, यासाठी शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा दिला, शिवसेनेची आघाडी करायची की नाही? याबाबत भरपूर चर्चा झाली, आमच्यावर सोनिया गांधी नाराज होत्या. पण आमची मते आम्ही पक्षनेतृत्वाकडे मांडली, भाजपला रोखण्यासाठीच आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला, भाजपला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे अशी भूमिका पटवून सांगितल्यानंतर सरकारमध्ये काँग्रेस आल्याचेही अशोक चव्हाणांनी सांगितले.

पण तिन्ही पक्षांमध्ये चांगल्यापद्धतीने समन्वय आहे, निधीच्या बाबतीत नाराजी आहे त्याचा परिणाम सरकारवर होईल, असे बिल्कुल नाही, सगळ्यांनाच निधी हवा आहे. याबाबत अधिक भाष्य अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात करू शकतील, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी दिली आहे.