निवडणूक आयोगाचा कमलनाथ यांना दणका; काढून घेतले ‘स्टार प्रचारक’ पद


भोपाळ – मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पोटनिवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. ‘आयटम’ या शब्दाचा एका महिला उमेदवाराबाबत वापर केल्यामुळे कमलनाथ यांचे स्टार प्रचारक पद निवडणूक आयोगाने काढून घेतल्यामुळे अशाप्रकारे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर कारवाई झाल्याने पक्षालाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने कमलनाथ यांच्यावर ही कारवाई वारंवार वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केली आहे. त्यामुळे यापुढे आता उमेदवाराच्या खर्चात कमलनाथ यांच्या सभेचा खर्च जोडला जाईल, त्याचबरोबर उमेदवाराच्या खर्चात कमलनाथ यांच्या विमान वाहतुकीचा खर्चही वाढवला जाईल. जे कोणी निवडणुकीत पक्षाचे स्टार प्रचारक असतात त्यांचा खर्च पक्षाच्या खात्यातून केला जातो. त्याचा भार उमेदवाराच्या खर्चात टाकला जात नाही.