विनामास्क फिरणाऱ्यांकडून महापालिकेने आतापर्यंत वसूल केला साडेतीन कोटींचा दंड


मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र तसेच राज्य सरकारकडून खबरदारीचा उपाय म्हणून मास्क परिधान करण्याच्या सूचना वारंवार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार देशासह राज्यात मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून पालिकेने आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्यांकडून साडेतीन कोटी रूपयांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी फिरताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशान्वये मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तींविरोधात ९ एप्रिलपासून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. दंडाची रक्कम सुरूवातीच्या काळात १ हजार रूपये एवढी होती. पण ती आता २०० रूपये करण्यात आली आहे. सर्वाधिक दंड मुंबई महापालिकेच्या ‘परिमंडळ-१’मधील नरिमन पॉइंट, कुलाबा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फोर्ट, मोहम्मद अली रोड, भेंडी बाजार, पायधुनी, काळबादेवी, गिरगाव, भायखळा, माझगाव या भागात वसूल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. २८ हजार २९२ नागरिकांवर या विभागांमध्ये कारवाई करण्यात आली. तसेच पालिकेने त्यांच्याकडून ६५ लाख ५६ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.

त्यानंतर ४७ लाख २५ हजार रुपयांचा दंड चेंबूर , कुर्ला, गोवंडी या भागांमध्ये २१ हजार ३१२ जणांवर करण्यात आलेल्या कारवाईतून वसूल करण्यात आला. पालिकेच्या अन्य चार परिमंडळांमध्ये २० हजारांहून अधिक नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून अंधेरी पश्चिम परिसरात सर्वाधिक म्हणजे ८ हजार ८९० जणांकडून दंड वसूल करण्यात आला.