१५ वर्षानंतर माईक टायसन पुन्हा मुष्टीयुद्ध मैदानात

फोटो साभार इनसायडर

अमेरिकेचा जगजेत्ता बॉक्सर ५४ वर्षीय माईक टायसन १५ वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा एकदा बॉक्सिंग रिंग मध्ये उतरण्यास सज्ज झाला असून ५१ वर्षीय रॉस जोन्स विरुद्ध तो २८ नोव्हेंबर रोजी एक प्रदर्शनीय सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी कॅलीफोर्नियाच्या अॅथलेटिक आयोगाने परवानगी दिली आहे.

अर्थात टायसन आणि जोन्स या दोघांनी हा मुकाबला केवळ प्रदर्शनी सामना म्हणून नाही तर खरा सामना असल्यासारखा गंभीरपणे खेळला जाईल असे सांगितले आहे. टायसन या संदर्भात म्हणतो, कोण म्हणतो हा खरा मुकाबला नाही? टायसन विरुद्ध जोन्स असा हा मुकाबला आहे. मी येतोय आणि जोन्सही येतोय.

या मुकाबल्याच्या प्रमोटर्सनी लॉस एंजेलिस येथे स्टॅपल्स सेंटर मध्ये हा सामना होणार असल्याची घोषणा केली आहे. यात प्रत्येकी दोन मिनिटांचे ८ राउंड होणार आहेत. टायसनने जून २००५ मध्ये शेवटचा अधिकृत सामना खेळाला असून १९९६ नंतर त्याने कोणताही खिताब जिंकलेला नाही. जोन्सने फेब्रुवारी २०१८ मध्ये शेवटचा सामना खेळला होता. या दोघानीही एकमेकांना जखमी करण्याचा प्रयत्न करू नये अशी विनंती आयोजकांनी केली आहे.