सूर्यफुलाच्या हालचालींमागे जैविक घड्याळ

surya
सूर्यफूलाचे नांव घेतले की पिवळ्याधमक रंगाची, मोठ्या पसरट आकाराची फुले चटकन नजरेसमोर येतात. सूर्य जसा वळेल तशी आपली मान वळविणारी ही फुले त्यामुळेच सूर्याच्या नावाने ओळखली जातात. सूर्यप्रकाशाला प्रतिसाद देण्याची अनोखी क्षमता या फुलांत असते. आजपर्यंत असा समज होता की सूर्यप्रकाशच या फुलांच्या हालचालींना म्हणजे सूर्याकडे सतत तोंड करण्याच्या क्रियेला कारणीभूत असतो. मात्र आता हा समज खोटा ठरला असून या फुलांमध्ये त्यांचे स्वतःचे जैविक घड्याळ असते आणि तेही सूर्यप्रकाशाइतकचे या फुलाच्या हालचालीला कारणीभूत असते असे दिसून आले आहे.

हा मनोरंजक शोध लावलाय कॅलिफोर्निया विद्यापीठातील वनस्पती तज्ञ हगॉप अॅटमन आणि स्टासे हार्मर यांनी. या दोघांनी प्रथम सूर्यफुलांची लागवड शेतात केली आणि त्यानंतर रोपे तयार झाल्यावर ती ग्रोथ चेंबरमध्ये हलविली. त्यानंतर या फुलांच्या डोक्यावर चोवीस तास प्रकाश देऊ शकणारा मोठा दिवा लावला गेला. अनेक दिवसांच्या निरीक्षणानंतर असे आढळले की या झाडांच्या एका बाजूच्या खोडाची वाढ झपाट्याने होते तेव्हा ही फुले मान वळवित असतात. डोक्यावर दिवा असूनही ही फुले पूर्वेकडून पश्चिमेकडे अशी दररोजच वळत होती. म्हणजेच केवळ सूर्यप्रकाशाला प्रतिसाद म्हणून ही फुले वळत नाहीत तर त्यांच्याआतील जैविक घडयाळही त्यांच्या या विशिष्ट हालचालींसाठी सूर्यप्रकाशाइतकचे कारणीभूत ठरते असा निष्कर्ष काढला गेला.

Leave a Comment