भारतात बनणार, परदेशात निर्यात होणार  उडती कार लिबर्टी

युरोपच्या रस्त्यांवर लवकरच दिसणारी आणि आकाशात झेपावू शकणारी फ्लाईंग कार लिबर्टी भारतात उत्पादित केली जाणार असून परदेशात निर्यात केली जाणार आहे. ही कार बनविणारी डच कंपनी पाल-व्ही ने त्यासंदर्भात गुजराथ सरकार बरोबर या कारच्या उत्पादन प्रकल्पासाठी एमओयु केला आहे. आगामी दशकात उडत्या कार्स हे मुख्य आकर्षण राहणार आहे. त्यासाठी वाहतूक नियमात बदल केले जात आहेत. त्याची सुरवात युरोप मधून झाली असून जगात लिबर्टी ही पहिली फ्लाइंग कार असेल हे आत्ता स्पष्ट झाले आहे. लिबर्टीची पहिली कार सेवा नेदरलँड्स मध्ये सुरु होणार आहे. लिबर्टीची पहिली लिमिटेड एडिशन कार पायोनियर या नावाने विकली जाणार आहे.

युरोप मध्ये या कार्सना रस्त्यावर चालविण्याची मंजुरी मिळाली आहे. ही कार रस्त्यावर ताशी १६० किमी वेगाने तर आकाशात ताशी १८० किमी वेगाने धावू शकते. ही कार दोन सिटर आहे आणि २६४ किलो वजन वाहून नेऊ शकते. या कारची किंमत ४ कोटी १६ लाख रुपये आहे. ड्रायविंग मोड मधून फ्लायिंग मोड मध्ये जाण्यास तिला १० मिनिटे लागतात. या कारचे उत्पादन भारतात केले जाण्याची दाट शक्यता आहे. गुजरात मध्ये बनलेल्या कार्स युरोप मध्ये निर्यात केल्या जातील असे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. २०२१ पासून या कार्सचे उत्पादन सुरु होत आहे.

ही कार चालविण्यासाठी चालकाला दोन परवाने घ्यावे लागणार आहेत. एक नेहमीचा कार ड्रायविंगचा परवाना आणि दुसरा फ्लायिंग परवाना.