भारतातही आहे चंद्रभूमी – लामायारू गाव

फोटो साभार ट्रीप अॅॅडव्हायझर

चंद्रावर जाऊन वसाहत करण्याची माणसाची स्वप्ने नजीकच्या काळात प्रत्यक्ष उतरतील असे संकेत मिळू लागले आहेत. काही अति उत्साही लोकांनी तर चंद्रावर जमिनी खरेदी केल्या आहेत. वास्तविक अंतराळात चंद्र अथवा अन्य तारयांवर जमिनी खरेदीस प्रतिबंध करणारा नियम केला गेला असून भारतासह १०४ देशांनी त्यावर सहमती दर्शविली आहे. पण उत्साही पर्यटकांना चंद्रभूमीवर जाण्याचे तेही फार खर्च न करता स्वप्न भारतात पुरे करता येणार आहे. त्यासाठी फक्त लडाख सहलीला जायची तयारी करावी लागेल.

लेह पासून साधारण १२० किमीवर असलेल्या लामायुरू या गावाची ओळख जगभरात मून लँड अशीच आहे. भारतात त्याला चंद्रभूमी म्हटले जाते. समुद्रसपाटी पासून ३५१० म्हणजे साधारण ११ हजार फुट उंचीवर असलेले हे ठिकाण गाठण्यासाठी अतिशय वळणावळणाच्या डोंगररस्त्यातून प्रवास करावा लागतो पण हा सर्व प्रवास अतिशय रम्य आणि तितकाच रोमांचकारी आहे. या ठिकाणची जागा चंद्रावरील जमिनीप्रमाणे आहे.

असे सांगतात येथे प्राचीन काळी सरोवर होते. महासिद्ध नारोपा यांनी सरोवर त्यांच्या शक्तीने सुकविले आणि तेथे बौद्ध मठाची स्थापना केली. या सरोवरातील मातीचा रंग पिवळा पांढरा असून चंद्रावरील जमिनीशी तिचे साम्य आहे. पौर्णिमेला चंद्रप्रकाशात ही माती चंद्रासारखी चमकते. या भागाची लोकवस्ती केवळ ७०० इतकीच आहे. येथील बौद्ध मठात अनेक प्राचीन ग्रंथ आहेत. हा मठ ११ व्या शतकातील आहे.

येथे पर्यटकांसाठी निवासाची सोय उत्तम असून अनेक हॉटेल्स आहेत. या उंचावरील जागेवरून आसपासचा परिसर अतिशय नयनरम्य दिसतो.