करोना विषाणू प्रतिबंधक लसीकरणासाठी केंद्राची तयारी सुरु

फोटो साभार इंडियन एक्सप्रेस

केंद्र सरकार कोविड १९ लसीकरणाच्या तयारीला लागले असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्या संदर्भात समन्वय समित्या स्थापन करण्यासंदर्भात सूचना देणारे पत्र पाठविले आहे. लसीकरणाचा कार्यक्रम राबविताना सार्वजनिक आरोग्य सेवेवर ताण येऊ न देण्याच्या सूचना दिल्या गेल्याचे समजते. तसेच सुरवातीपासूनच सोशल मिडीयावर नजर ठेवण्याचे आदेश राज्यांना दिले गेले आहेत. सोशल मिडियावरील अफवांमुळे लसीकरण कार्यक्रमावर प्रभाव पडू शकतो म्हणून ही काळजी घेतली गेल्याचे समजते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे मुख्य सचिव राजेश भूषण यांनी पाठविलेल्या पत्रानुसार लसीकरणाचा कार्यक्रम संपूर्ण देशात राबविण्यासाठी एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागू शकेल. सर्वप्रथम ही लस आरोग्य सेवकांना दिली जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाने त्यासाठी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवर समित्या नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत. या समित्या लसीकरणाच्या तयारीवर लक्ष ठेवतील. यात लस साठवणीसाठी शीतगृहे, लस वाहतूक, दुर्गम भागात लस नेताना घ्यावयाची काळजी असे अनेक मुद्दे विचारात घेतले गेले आहेत. राज्याने मुख्य सचिव, आरोग्य विभाग मुख्य सचिव आणि जिल्हापातळीवर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली या समित्या नेमायच्या आहेत असेही समजते.