फ्रान्सच्या राष्ट्रपतींविरोधात झाकीर नाईकने ओकली गरळ


नवी दिल्ली – फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रों यांच्याविरोधात काही देशात इस्लामबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे निदर्शने करण्यात येत आहेत. वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईकने या विरोध प्रदर्शनाची बाजू घेत चिथावणीखोर पोस्ट शेअर केली आहे. फ्रान्सच्या राष्ट्रपतींविरोधात त्यात त्याने गरळ ओकली आहे. त्याचबरोबर त्याने याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही दिला आहे.

फ्रान्सच्या राष्ट्रपतीविरोधात झाकीर नाईक प्रक्षोभक पोस्ट टाकत आहे. त्याने याआधी फ्रान्सच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन सोशल मीडियावर केले होते. त्याने आता आणखी एक चिथावणीखोर पोस्ट शेअर केली आहे. ‘… अल्लाहच्या दूतांना शिव्या देणाऱ्यांना याची शिक्षा भोगावी लागेल, याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागेल, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तो तरुणांना या पोस्टद्वारे फ्रान्सविरोधात चिथावण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेत त्याच्या प्रक्षोभक विचारांचा प्रसार करत असल्याचा आरोप होत आहे. भारतातील काही लोकांनाही त्याने चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या विचारांच्या प्रभावाने घातपाती कारवाया घडल्याचे तपास यंत्रणांना आढळले आहे.

विद्यार्थ्यांना मोहम्मद पैंगबर यांचे वादग्रस्त कार्टून फ्रान्समध्ये एका शिक्षकाने वर्गामध्ये दाखवल्यानंतर त्या शिक्षकाची एका विद्यार्थ्याने हत्या केली. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोंनी याघटनेचा उल्लेख दहशतवादी घटना असा केला होता. तसेच इस्लामकडून होणारे हल्ले खपवून घेणार नसल्याचे म्हटले होते. इमॅन्युएल मॅक्रों यांनी मोहम्मद पैंगबर यांचे वादग्रस्त कार्टून कायम ठेवण्याचा निर्णयही घेतला होता. तसेच इस्लामबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. अनेक मुस्लीम देशांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध दर्शवला. तुर्कस्थान, सौदी अरब, कतार, जॉर्डन, पाकिस्तान आणि बांग्लादेशसह अनेक देशात मॅक्रों यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच फ्रान्सच्या उत्पादनांचा बहिष्कार करण्यात आला. आता झाकीर नाईकने मॅक्रों यांच्याविरोधात गरळ ओकली आहे.