१ नोव्हेंबरपासून पुण्यातील उद्याने या वेळेत होणार खुली


पुणे – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्याप कायम असून देशातील कोरोनाबाधितांची संख्या ८० लाखांच्या पार गेली आहे. पण मुंबईनंतर आता पुण्यातील कोरोनाची बाधा होण्याची गती मंदावली आहे. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मागील अनेक महिन्यांपासून पुण्यातील उद्याने बंद होती, पण नोव्हेंबर महिन्याच्या १ तारखेपासून शहरातील उद्याने सुरु करण्यात येणार असून त्यासंदर्भातील नियमावली पुणे महानगरपालिकेकडून जारी करण्यात आली आहे. पण उद्याने जरी खुली करण्यात येणार असली तरी उद्यानात ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षांखालील मुलांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचे पालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

पुणे महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमावलीनुसार, कंटेन्मेंट झोन वगळता शहरातील सर्व उद्याने १ नोव्हेंबरपासून सकाळी ६ ते ८ आणि संध्याकाळी ५ ते ७ या वेळात उघडी राहतील. दिवसभरात फक्त ४ तास उद्याने खुली असतील. सोशल डिस्टन्सिंगचे नियम आणि मास्क अनिवार्य आहे. बागा उघडल्या तरी बागेतील घसरगुंडी, झोपाळे, सी सॉ अशी खेळणी आणि ओपन जिममधील व्यायामाची उपकरणे वापरता येणार नाहीत. ८ महिने बंद असलेली शहरातील ८५ उद्याने १ नोव्हेंबर पासून खुली होणार आहेत. पण नियमभंग करणाऱ्यांवर मात्र कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे. त्याचबरोबर मास्क, सॅनिटायजरचा वापर अनिवार्य असेल तसेच ६ फूट शारीरिक अंतर पाळणे बंधनकारक असणार आहे.