उर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीवरुन शिवसेनेला निलेश राणेंचा टोला


मुंबई: शिवसेना आपल्या कोट्यातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यावरुन आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देत असल्यामुळे जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुर्च्या, स्टेज लावा, असे म्हणत टोला लगावला आहे.

यासंदर्भात ट्विट करत निलेश राणे म्हणाले की, जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुर्च्या, स्टेज लावा, आंदोलन करा, केसेस घ्या. तुमची किंमत नाही की तुम्हाला पक्ष आमदारकी देईल. तसेच एक वेळ अशी येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील.

तत्पूर्वी, शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी संवाद साधल्याची माहिती सुत्रांनी दिली. पण अद्याप उर्मिला मातोंडकर यांचे उत्तर समोर आलेले नाही. उर्मिला मातोंडकर यांना आपल्या कोट्यातून मराठी चेहरा आणि मराठी नाव असल्यामुळे उमेदवारी देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कला क्षेत्रातून त्या असल्यामुळे राज्यपाल नियुक्त जागेसाठी योग्य उमेदवार आहेत.