ठाकरे सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी; निलेश राणेंची टीका


मुंबई: परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून अद्यापही त्यांना सरकारी मदत न मिळाल्यामुळे ठाकरे सरकारवर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. हे सरकार नुसते बोलबच्चन असून त्यांच्याकडून प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवले जात आहे. जर प्रत्येकवेळी केंद्राकडेच बोट दाखवायचे असेल तर मंत्रालयही दिल्लीला हलवा, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.


ट्विटरच्या माध्यमातून निलेश राणे यांनी ही टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणतात, ठाकरे सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी. नुसते बोलबच्चन. पंचनामे झाले आता पुढे काय?? आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू सांगणारे ठाकरे सरकारचे मंत्री कुठे गेले? प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवायचे असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा.

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे अवकाळी पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून राज्यातील अनेक मंत्री या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर शेतकऱ्यांना दहा हजार कोटीचे पॅकेजही जाहीर केले होते. पण अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा दावा निलेश राणे यांनी केला असून त्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.