मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीला काँग्रेसचा विरोध


नवी दिल्ली – मुख्य माहिती आयुक्तपदी माजी ‘आयएफएस’ आयुक्त यशवर्धन कुमार सिन्हा आणि माहिती आयुक्तपदी उदय माहूरकर यांच्या नियुक्तीला काँग्रेसने विरोध व्यक्त केला आहे. ‘इमानदारी निभावण्यासाठी’ त्यांची नियुक्ती करण्यात आल्याची उपरोधिक टिप्पणी काँग्रेसने केली आहे. या नियुक्त्यांवरून नवा राजकीय झगडा सुरू होण्याची चिन्ह आहेत.

देशाच्या मुख्य माहिती आयुक्तपदी सिन्हा यांची नियुक्ती करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकार उदय माहूरकर यांचीही माहिती आयुक्तपदी नियुक्ती केली जाणार आहे. याबाबत राष्ट्रपती भवनातून लवकरच घोषणा करण्यात येणार आहे.

मुख्य आयुक्त पदासाठी १३९ जणांनी, तर माहिती आयुक्त पदासाठी ३५५ जणांनी अर्ज केला होता. निवड समितीला सिन्हा आणि माहूरकर यांची निवड करण्यामागील ठोस करणे विशद करण्यात आलेली नाहीत. माहूरकर यांनी तर या पदासाठी अर्जही केला नव्हता, असा दावा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.

माहूरकर हे उघडपणे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत. त्यांनी अर्जही न करता त्यांच्या गळ्यात या पदाचे लोढणे अडकवण्यात आले असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.