अखिलेश यादव यांची भेट घेणाऱ्या 7 आमदारांची बसपामधून हकालपट्टी


लखनऊ – समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची बहुजन समाज पक्षाच्या 7 आमदारांनी भेट घेतल्यामुळे उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. दरम्यान त्या 7 आमदारांची बसपामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीत सपाच्या उमेदवारांना हरविण्यासाठी बसपा पूर्ण ताकद लावणार असून वेळप्रसंगी भाजप आणि अन्य कोणत्याही विरोधी पक्षाला मत देऊ, असे बसपाच्या प्रमुख मायावती यांनी म्हटले आहे.

दरम्यान सपाचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते राजेंद्र चौधरी मायावती यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना म्हणाले की, मायावती यांच्या वक्तव्यावरून त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याचे स्पष्ट होते. 403 सदस्यीय उत्तर प्रदेश विधानसभेत बसपाचे 18 आमदार आहेत. यापैकी सात आमदारांनी बुधवारी राज्यसभा उमेदवार रामजी लाल गौतम यांना विरोध दर्शवल्यानंतर मायावती यांनी आपल्या पक्षातील सात आमदारांची हकालपट्टी केली आहे. दरम्यान या आमदारांनी इतर कोणत्याही पक्षात जाण्याची योजना नसल्याचे सांगितले.