महाराष्ट्राची जगाला फळे पुरविण्याची क्षमता

export
पूर्ण जगाला फळे पुरविण्याची ताकद एकट्या महाराष्ट्रात आहे, असा निर्वाळा अनेक तज्ञांनी अनेक वेळा दिलेला आहे आणि त्याचा प्रत्यय आता यायला सुद्धा लागला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये १४ लाख हेक्टर जमिनीत ङ्गळबागा उभारण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्राचे एकूण लागवडयोग्य क्षेत्र २ कोटी २४ लाख हेक्टर्स एवढे आहे. म्हणजे फळबागायतीखाली आलेले क्षेत्र जेमतेम सात टक्के सुद्धा नाही. एवढ्या कमी क्षेत्रात ङ्गळांची लागवड होत असून सुद्धा महाराष्ट्राचा जगाच्या ङ्गळाच्या बाजारामध्ये गवगवा व्हायला लागला आहे. महाराष्ट्रातली ७० ते ८० लाख हेक्टर जमीन ङ्गळबागायतीखाली आली (आणि सरकारने योग्य धोरण स्वीकारून निर्यातीला प्रोत्साहन दिले तर) तर सार्‍या जगाला पुरेल एवढी ङ्गळे तयार करणे महाराष्ट्रासाठी काहीच अवघड नाही. हे क्षेत्र एकूण लागवड क्षेत्राच्या जवळपास ३० टक्के एवढे होते. म्हणजे एवढी ङ्गळे लावणेही शक्य आहे आणि ती सार्‍या जगाला पुरविणेही शक्य आहे. त्यासाठी ङ्गार सरकारवर अवलंबून मात्र राहता कामा नये. सरकारने या बाबतीतले आपले कर्तव्य केलेले आहे.

फळबागायतीची ताकद श्री. शरद पवार यांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी स्वत: मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये एक अभिनव योजना सुरू केली. या योजनेचे नाव रोजगार हमीतून ङ्गळबाग लागवड असे ठेवण्यात आले आहे. १९९१ साली ही योजना सुरू झाली. शेतकर्‍यांनी आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर फळबागा लावाव्यात, हा या योजनेमागचा हेतू आहे. जो शेतकरी आपल्या शेतामध्ये फळबाग लावील त्या शेतकर्‍याला त्यासाठीची मजुरी सरकार रोजगार हमी योजनेच्या मार्ङ्गत देईल. म्हणजे शेत तुमचे, झाड तुमचे पण ते झाड लावण्याचा खर्च सरकार देणार आहे. या योजनेमुळे अनेक शेतकर्‍यांनी फळबागा लावल्या. १९९१ पूर्वी महाराष्ट्रातली केवळ २ लाख हेक्टर जमीन फळबागांखाली होती. परंतु या योजनेमुळे हा आकडा १४ लाख हेक्टरवर गेला आहे. महाराष्ट्रातल्या अजूनही अनेक शेतकर्‍यांना ही योजना माहीत नाही. ती माहीत करून घेऊन, कृषी खात्यात चौकशी करून आपल्या शेतामध्ये तिच्या माध्यमातून फळबागांचा विकास केला पाहिजे.

ज्या शेतकर्‍यांची स्थिती सुधारलेली आहे त्यांच्याकडे फळबागाच आहेत आणि ङ्गळबागांमुळेच शेतकरी चांगला सुधरू शकतो. महाराष्ट्रामध्ये हवामान मुख्य सात ङ्गळ पिकांसाठी अनुकूल आहे. ती सात पिके म्हणजे केळी, आंबा, डाळींब, बोर, द्राक्ष, चिकू आणि संत्रे. या सात पिकांना महाराष्ट्राच्या विविध भागातले हवामान पोषक आहे आणि बरेचसे हौशी शेतकरी त्या त्या भागामध्ये या फळबागा करतही आहेत. त्याशिवाय काजू, मोसंबी, पेरू, नारळ, कागदी लिंबू, सिताङ्गळ, ङ्गणस, अंजीर, पपई हीही ङ्गळपिके घेतली जात आहेत. आता महाबळेश्‍वर भागामध्ये स्टॉबेरिचेही पीक चांगले रुजले असून तिथल्या शेतकर्‍यांनी निर्यातीच्या माध्यमातून चांगला पैसा कमवायला सुरुवात केली आहे. सार्‍या जगामध्ये नाशिकच्या द्राक्षाचे नाव घेतले जाते. नाशिक हा जिल्हा द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे असे आपल्याला लहानपणापासून शाळेमध्ये शिकवले गेलेले आहे. परंतु १९६० पर्यंतच्या काळात महाराष्ट्रात द्राक्षाची लागवड होऊ शकेल का, याविषयी शंका व्यक्त केल्या जात होत्या. महाराष्ट्रात द्राक्षाची लागवड होऊ शकत नाही, इथले हवामान द्राक्षाला अनुकूल नाही, ते यूरोप खंडातले पीक आहे असाच लोकांचा समज होता. परंतु अकोल्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. राधाकृष्णन् यांचा दावा मात्र वेगळा होता.

महाराष्ट्रात द्राक्षे येऊ शकतील असे ते लोकांना सांगत होते. मात्र त्यांच्या ऐकण्याच्या मन:स्थितीत कोणी नव्हते. त्यामुळे त्यांनी निवृत्त झाल्यानंतर हाती पडलेल्या रकमेतून नाशिक जिल्ह्यात स्वत:च जमीन खरेदी केली आणि तिथे द्राक्षाची लागवड करून ती यशस्वी करून दाखवली. सुरुवातीला हा प्रयोग नाशिक जिल्ह्यात झाला आणि नाशिक जिल्ह्यातच द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले. आता मात्र नाशिक बरोबरच पुणे, नगर, सांगली, सातारा, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, सोलापूर, लातूर आणि उस्मानाबाद एवढ्या जिल्ह्यांमध्ये द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. अशी एकेका ङ्गळाची कहाणी आहे. मात्र काही तज्ञ आणि धडपड्या शेतकर्‍यांनी अनेक पिकांचे प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी केलेले आहेत. त्यांचा आढावा घेत सर्व शेतकर्‍यांनी फळबागायतीची कास धरावी. त्यातून स्वावलंबी आणि स्वाभीमानी शेतकरी उभा राहू शकतो.

दुष्काळी भागाला वरदान

फळबागांमुळे महाराष्ट्राच्या शेतीत ङ्गार मोठे परिवर्तन घडले आहे आणि घडणार आहे. सध्या आपल्या देशात जंगलांचे प्रमाण कमी होत असल्याबद्दल नेहमीच चिंता व्यक्त केली जात असते. जमिनीच्या क्षेत्रफळाच्या ३३ टक्के क्षेत्र हे जंगलांखाली असणे पर्यावरण आणि पाऊस यासाठी आवश्यक असते पण आपण जळण, ङ्गर्निचर आणि बांधकाम यांसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली असल्याने जंगलांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण वाढावे यासाठी सरकारचा मोठा प्रयत्न सुरू आहे पण त्याला काही प्रतिसाद मिळत नाही. जंगल वाढण्याऐवजी ते कमी होत चालले आहे. असे असले तर महाराष्ट्रात आता लागवड क्षेत्राच्या १० टक्के क्षेत्रावर ङ्गळझाडे लावून शेतकर्‍यांनी तेवढे जंगलच वाढवले आहे. फळबागायती खालील क्षेत्राचे प्रमाण लागवड क्षेत्राच्या ३० ते ३५ टक्के झाल्यावर तर त्या रुपाने जंगल वाढवण्याला चांगलीच मदत होणार आहे. सरकारी प्रयत्नातून अशी जंगल वाढ केली असती तर तिला अनेक वर्षे लागली असती आणि एवढ्या उत्स्फूर्तपणाने ते काम झालेही नसते. शेतकर्‍यांनी मात्र हे काम १५ ते २० वर्षात केले आहे. म्हणजे त्यांनी हे स्वत:च्या फायद्यासाठी केले पण त्यातून फार मोठी समाजसेवा आपोआपच साध्य झाली आहे.

महाराष्ट्राच्या काही भागात ङ्गळबागांनी मोठेच परिवर्तन घडवले आहे. कोकणाचा उल्लेख याबाबत ङ्गार पूर्वीपासूनच केला जातो. तिथे पाऊस भरपूर पडतो पण कोकणातली जमीन तीव्र उताराची असल्यामुळे आणि पाऊस पडणार्‍या डोंगर माथ्यापासून समुद्र जवळ असल्यामुळे भरपूर पडलेल्या पावसाचे पाणी थोडाच काळ वहाते आणि पटकन समुद्राला जाऊन मिळते. जमीन हलकी आणि खडकाळ असल्यामुळे पाऊस खूप पडूनही ते जमिनीत मुरत नाही आणि कायम दुष्काळ असतो पण तिथल्या शेतकर्‍यांनी नारळी, पोङ्गळी, आंबा, काजू, अननस, ङ्गणस अशा पिकांची कास धरून बराच पैसा कमावला आहे. म्हणूनच १९८० साली कोकणातले बॅ. अ. र. अंतुले यांनी मुख्यमंत्री होताच कोकणातली ही फळ बागायती वाढवून कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याची घोषणा केली होती. ती घोषणा फार वेगाने अमंलात आली नाही. आता या गोष्टीला ३० वर्षे होत आली आहेत आणि सार्‍या महाराष्ट्राचाच कॅलिफोर्निया होण्याच्या मार्गावर आहे.

आज जगात फळांच्या बाबतीत कॅलिफोर्निया, इस्रायल, ब्राझील या देशांचा गवगवा होत आहे. जगाला चांगल्या भाज्या आणि फळे पुरवणारा इस्रायल हा काही सुपीक प्रदेश नाही. ते वाळवंट आहे. कॅलिफोर्निया हा अमेरिकेचाच एक प्रांत आहे तोही काही फार मोठा पाऊस पडणारा भाग नाही. उपलब्ध माहितीनुसार कॅलिफोर्नियात जमीन हलकी आहे आणि जेमतेम २२ इंच पाऊस पडतो. पण या राज्यातून जगभरात चांगली फळे पाठवली जातात. तेव्हा फळबागायतीला फार सुपीक काळीभोर जमीन लागत नाही. महाराष्ट्रात त्याचा प्रत्यय आला आहे. सोलापूर हा महाराष्ट्रातला सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातल्या माढा, सांगोला, करमाळा या तालुक्यात पाऊस हा पाहुणा आल्यासारखा आणि पडून न पडल्या सारखा असतो. सांगोला हा तर ठार दुष्काळी म्हणजे फार तर १० इंच पाऊस पडणारा तालुका आहे. या तालुक्यातले मेंढपाळ मेंढरे घेऊन राज्यात फिरणार आणि बाकीचे लोक रोजगार हमी कामांवर जगणार अशी स्थिती होती.

जमीनही कमालीची हलकी. जमीन हलकी, पाऊस कमी आणि कमालीची कोरडी हवा. आजवर आपण याच तर स्थितीला दुष्काळी स्थिती म्हणत आलो आहोत. पण या तालुक्यातल्या लोकांना डाळिंबांची माहिती मिळाली तशा त्यांनी डाळिंबाच्या बागा लावल्या. आपण जिला दुष्काळी स्थिती म्हणतो ती डाळिंबांसाठी अनुकूल स्थिती आहे आणि डाळिंबांचे उत्पन्न उसापेक्षा चांगले आहेे याचा अनुभव या तालुक्यातल्या लोकांना आला. म्हणजे जमीन कशी आहे किंवा पाऊस किती पडतो यावर सुकाळ किंवा दुष्काळ ठरत नसतो तर जमीन, पाणी कसेही असो त्याला अनुकूल अशी पिके घेतो की नाही यावर दुष्काळ आणि सुकाळ अवलंबून असतो. म्हणूनच ठार दुष्काळी सांगोला तालुका आता अकलूजशी बरोबरी करायला लागला आहे. पाऊस कमी पडला तर शेतातली ज्वारी, गहू अशी पिके करपून जातात. वाळतात पण ङ्गळांच्या बागांचे तसे नसते. म्हणून कमी पाण्यावर येणार्‍या अनेक ङ्गळबागा हे दुष्काळी भागांना वरदान ठरले असून त्यांचे दैन्य दूर व्हायला लागले आहे. ही फळांची किमया आहे.

1 thought on “महाराष्ट्राची जगाला फळे पुरविण्याची क्षमता”

  1. अतिशय छान माहिती व बरीच पुस्तके चाळून सुध्दा एवढ्या लवकर हि माहिती मिळणार नाही तसेच फळबागेबद्दल मा. शरद पवार साहेबांची दुरदृष्टी सुद्धा दिसुन दिसुन येते.

Leave a Comment