शारीरिक हालचाली नसल्यामुळे अनेक समस्या

fat
भारतात करण्यात आलेल्या एका नव्या अभ्यासामध्ये शारीरिक हालचाली नसल्यामुळे सर्वसाधारण लठ्ठपणा वाढत चालला असल्याचे दिसून आले आहे. बैठी कामे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे लठ्ठपणा वाढतो ही गोष्ट सर्वसाधारणपणे दिसून येतच होती. परंतु या दोन गोष्टींचा थेट आणि प्रत्यक्ष संबंध असल्याचे आता संशोधनात दिसून आले आहे. सातत्याने वाहनावरून फिरणे, केवळ खुर्चीत बसून काम करणे, आरामखूर्चीत बसून टीव्ही पाहणे यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि त्या लठ्ठपणातून आरोग्याशी संबंधीत असलेले प्रश्‍न निर्माण होतात.

टाईप-२ डायबेटिस, हृदयविकार, उच्च रक्तदाब, चरबी वाढणे आणि निद्रानाश अशा आरोग्याच्या समस्या जाडीतून वाढायला लागतात. महिलांमधील लठ्ठपणा हा घरगुती कामे कमी झाल्यामुळे वाढत आहे. त्यातल्या त्यात तरुण महिलांना याचा फटका बसत आहे. दोन तास बैठे काम करणार्‍या व्यक्तीने किमान २० मिनिटे तरी व्यायाम केला पाहिजे, तरच त्याची लठ्ठपणातून सुटका होईल असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

हृदयविकार होणार्‍या बहुतेक व्यक्तींमध्ये बैठे काम हाच एक मोठा दोष आढळलेला आहे. ज्या व्यक्तीला सहा तास पर्यंत एका जागेवर बसून काम करावे लागते त्यांना हृदयविकाराचा त्रास होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. त्यांनी किमान एक तास तरी व्यायाम केला पाहिजे असे शास्त्रज्ञांचे मत आहे. ज्या लोकांना सतत बसूनच रहावे लागते आणि ज्यांच्या कामाचे स्वरूपच तसे आहे त्यांनी कसल्या ना कसल्या तरी छोट्या मोठ्या हालचाली कराव्यात. उगाच खुर्चीवरून उठून उभे रहावे, जागा बदलावी, फोन घेण्यासाठी दुसर्‍या टेबलवर जावे, निदान बसल्या जागेवर शरीराला आळोखे पिळोखे तरी द्यावेत म्हणजे त्यांची या दोषातून मुक्तता होऊ शकेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment