योगाभ्यासी १२४ वर्षीय शिवानंद बाबा जगातील वयोवृध्द व्यक्ती

फोटो साभार संजीवनी

वाराणसी येथील स्वामी शिवानंद बाबा यांनी ८ ऑगस्ट २०२० रोजी वयाची १२४ वर्षे पूर्ण केली असून जगातील वयोवृध्द व्यक्ती म्हणून त्यांची नोंद गिनीज बुक मध्ये करण्यासाठी त्यांचे शिष्य प्रयत्न करत आहेत. सध्या जगातील सर्वाधिक वयोवृद्ध म्हणून जपानच्या चीतेयू वटनबे यांच्या नावाची नोंद गिनीज मध्ये असून त्याचे वय ११२ वर्षे आणि ३४४ दिवस नोंदले गेले आहे.

शिवानंद बाबा योगाभ्यासी आहेत आणि आजही न चुकता रोज पहाटे तीन वाजता उठून योगाभ्यास करतात. त्यांच्या आधार कार्ड आणि पासपोर्टवर त्यांची जन्मतारीख ८ ऑगस्ट १८८६ अशी नोंद्विली आहे. त्यांचा जन्म श्रीहट्ट, हबीबगंज येथे झाला होता. सध्या हे स्थान बांगलादेश मध्ये आहे. शिवानंद बाबांचे शिष्य जगभर असून त्यांनी अनेक देशात प्रवचने दिली आहेत. त्यात अमेरिका, इंग्लंड, बांग्लादेशाचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शिवानंद बाबा यांचे आईवडील भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असत. बाबा चार वर्षाचे असताना त्याच्या आईवडिलांनी त्यांना ओंकारनाथ गोस्वामी यांच्या आश्रमात सोडले. त्यानंतर बाबा तेथेच लहानाचे मोठे झाले आणि त्यांनी योगाभ्यास केला. अत्यंत नियमित दिनक्रम हे बाबांच्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे. वरण भात, उकडलेले कारले, बटाटे असा साधा आहार घेणारे बाबा तेल मसाले यांचे सेवन करत नाहीत तसेच दुध, फळे सुद्धा खात नाहीत. ते म्हणतात देशातील कित्येक नागरिकांना साधे अन्न सुद्धा नशिबात नाही.

बाबा आजपर्यंत कधीही आजारी पडलेले नाहीत. भारतासाठी नागरिकांचे सरासरी वयोमान ६२ वर्षाचे असताना बाबा १२४ व्या वर्षीही पूर्ण निरोगी आहेत. त्यांचे शिष्य बाबांच्या नावाची नोंद गिनीज बुक मध्ये जगातील सर्वात वयोवृध्द म्हणून केली जावी यासाठी प्रयत्न करत आहेत.