तैवानने जिंकली करोना विरुध्द लढाई

फोटो साभार डेक्कन क्रोनिकल

जगभर करोना विषाणूच्या प्रकोपाची दुसरी, तिसरी लाट आल्याच्या बातम्या येत असतानाच चीनचा शेजारी तैवानने मात्र करोनावर मोठेच यश मिळविले आहे. गेल्या २०० दिवसात तैवान मध्ये करोनाची एकही नवी केस आलेली नाही. तैवानने करोनाविरुद्धची लढाई अतिशय हुशारीने जिंकली असल्याचे दिसून येत आहे. तैवान मध्ये १२ एप्रिल रोजी करोनाची शेवटची केस नोंदली गेली असून या देशात करोनाची दुसरी लाट आलेली नाही.

जगभरातील देश तैवानच्या या यशामागचे कारण जाणून घेत आहेत. या देशाची लोकसंख्या २ कोटी ३० लाख आहे आणि त्यातील ५५३ जणांना करोनाची लागण झाली होती. करोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आहे केवळ ७. तैवानने पहिली करोना केस समोर आल्याबरोबर देशाच्या सीमा बंद केल्या आणि प्रवासी संख्येवर नियंत्रण आणले त्यामुळे करोना विरुध्द लढाई त्यांना सोपी गेल्याचे सांगितले जात आहे. तैवान कोविड ट्रान्समिशन संपविणारा एकमेव देश बनला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलमधील साथीचे रोग तज्ञ पिटर कॉलीग्नन म्हणाले तैवान ने करोना बाबत जगात सर्वात चांगली कामगिरी केली आहे. जानेवारीत पाहिला करोना बाधित समोर आल्यावर त्यांनी सीमा सील केल्या शिवाय जे तैवानी मायदेशी परतले त्यांना १४ दिवस विलगीकरणात ठेवले. फेस मास्कचे वितरण मोठ्या प्रमाणावर केले. संसर्ग सुरु होताच स्थानिक फेस मास्कच्या निर्यातीवर बंदी घातली आणि चार महिन्यात मास्कचे उत्पादन एका दिवसाला २० लाख मास्क वर नेले. त्यांना कोविड विरोधात मिळालेल्या यशात या उपाययोजनांचा मोठा वाटा आहे.

तैवान मध्ये ३,४०,००० नागरिकांना होम क्वारंटाईन केले गेले असून १ हजार नागरिकांना करोना नियम मोडला म्हणून दंड केला गेला आहे.