आर्मेनियाच्या रक्षणासाठी पंतप्रधानाच्या पत्नी अॅना युद्ध मैदानात

फोटो साभार शी द पीपल

आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशात सुरु असलेले युद्ध लवकर शमण्याची चिन्हे दिसत नसतानाच आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिनयान यांच्या पत्नी अॅना स्वतः देश रक्षणासाठी युद्धभूमीवर उतरल्या आहेत. त्यांनी महिला आघाडीत सैन्य प्रशिक्षण घेण्याची सुरवात केली असून त्यांचे प्रशिक्षण २७ ऑक्टोबर पासून सुरु झाले आहे. ४२ वर्षीय अॅना यांच्यासोबत अन्य १३ महिला सैन्य प्रशिक्षण घेत आहेत. अझरबैजन विरुद्ध त्या प्राणाची बाजी लावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

ही महिला तुकडी रायफल सह अन्य शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण घेत आहे. दोन्ही देशातील युद्ध परिस्थिती निवळत नसल्याचे पाहून रशियाने आर्मेनियाच्या बाजूने युद्धात उडी घेतली आहे तर अझरबैजनच्या मदतीला तुर्कस्थान येत आहे. अॅना युद्धभूमीवर उतरल्याने आर्मेनिया सैनिकांचे मनोबल वाढले असून अॅना यांनी कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही शत्रूसमोर झुकणार नाही असा इशारा दिला आहे. अॅना यांचा २० वर्षाचा मुलगा सुद्धा सैन्यात स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी करत आहे.

नार्गोना काराबाख क्षेत्रात गेल्या २७ सप्टेंबरपासून या दोन्ही देशात युध्द छेडले गेले असून आत्तापर्यंत ५ हजार लोकांचा जीव गेला आहे. १० ऑक्टोबर पासून ३ वेळा युध्दविराम घोषणा केल्या गेल्या असल्या तरी काही तासात पुन्हा युद्धाला तोंड फुटते आहे. अझरबैजनला तुर्कस्थानने समर्थन दिले आहे मात्र त्यांना सीमेवर प्रथम रशियन सैन्याला सामोरे जावे लागणार आहे.

Loading RSS Feed