विनामास्क रेल्वे प्रवास पडणार महागात; भरावा लागणार 200 रुपये दंड


मुंबई – विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात यावा, असे निर्देश महाराष्ट्र सरकारने रेल्वे पोलिसांना नुकतेच दिल्यामुळे चेहऱ्यावर यापुढे मास्क असणे आवश्यक आहे. मुंबई लोकल प्रवासादरम्यान हा दंड आकारण्यात येणार आहे. राज्य सरकारने हे निर्देश आटोक्यात आलेल्या कोरोना व्हायरस संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी दिले आहेत.

जीआरपी आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना राज्य सरकारचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेने 9 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकाच्या अनुषंगाने हा दंड आकारला जाईल. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातलेल्या लोकांना 200 रुपये दंड ठोठावत आहे.

महापालिकेच्या परिपत्रकानुसार, मुंबई लोकलमधून प्रवास करताना किंवा स्टेशन परिसरात मास्क न लावता फिरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, प्रवाशाला दंड आकारण्याचा रेल्वे पोलिसांना अधिकार आहे. कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासठी आपण सर्व नियम, संकेत पाळले पाहिजेत असेही या परिपत्रकात म्हटले आहे. माहिती देताना सेनगावकर यांनी पुढे सांगितले की, बुधवारी सायंकाळी त्यांना हे पत्र मिळाले. त्यानुसार महापालिकेशी समन्वय साधून निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी पुढची पावले टाकली जातील, असे सेनगावकर यांनी सांगितले.