यंदाची अध्यक्षपदाची निवडणूक ठरणार विक्रमी खर्चिक


वॊशिंग्टन: यंदाची अमेरिकेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक कमालीची खर्चिक ठरणार असून आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक विक्रमी खर्च या निवडणुकीत होणार असल्याचे भाकीत ‘द सेंटर फॉर रिस्पॉन्सिव्ह पॉलिटिक्स’ या संशोधन संस्थेने वर्तविले आहे. या निवडणुकीसाठी तब्बल १ हजार ४०० कोटी डॉलर्स खर्च होतील, असा संस्थेचा अंदाज आहे.

या निवडणुकीदरम्यान शेवटच्या महिन्यात राजकीय देणग्यांचे प्रमाण असाधारणपणे वाढल्याचे निरीक्षण संस्थेने नोंदविले आहे. यापूर्वीच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी १ हजार १०० कोटी डॉलर्स खर्च झाले होते. या निवडणुकीसाठी अपेक्षित असलेली १ हजार ४०० कोटी सोलर्स ही रक्कम हा निवडणूक खर्चाचा विक्रमी आकडा ठरणार आहे.

अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेले जो बेडेन हे देणगीद्वारे १०० कोटी डॉलर जमा करणारे पहिले उमेदवार ठरले आहेत. त्यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेचा १४ ऑक्टोबरपर्यंतचा खर्च ९३ कोटी ८० लाख डॉलर एवढा आहे. त्यांचे रिपब्लिकन प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांनी ५९ कोटी ६० लाख डॉलर देणगीद्वारे जमा केले आहेत.

या वर्षी करोना महासंसर्ग आणि त्यामुळे जारी करण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे अर्थचक्राला खीळ बसलेली असूनही या निवडणुकीत राजकीय देणग्यांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्वसामान्य नागरिक छोट्या रकमेच्या देणग्या देत आहेत तर कोट्याधीशांकडून आठ आकडी रकमेच्या देणग्या मिळत आहेत, असे संस्थेने आपल्या अहवालात नमूद केले आहे. विशेषतः महिलांकडून मोठ्या देणग्या मिळत असल्याचे निरीक्षणही नोंदविण्यात आले आहे.