सीरम इन्स्टिट्यूटने वर्तवला येत्या डिसेंबरपर्यंत कोरोना लस येण्याचा अंदाज


पुणे : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी भारतातील कोरोनाची लस कधी येणार याची माहिती दिली असून या वर्षीच्या शेवटी म्हणजे डिसेंबरपर्यंत भारतात कोरोनाची लस उपलब्ध होण्याची शक्यता अदर पूनावाला यांनी वर्तवली आहे. त्यांनी यासोबत हेही स्पष्ट केले की ब्रिटनमध्ये या लसीवर सुरु असलेली चाचणी आणि डीसीजीआयची मान्यता यावर ही लस कधी तयार होईल हे अवलंबून असणार आहे.

याबाबत माहिती देताना अदर पूनावाला यांनी सांगितले की ही कोरोना लस ब्रिटनमध्ये अॅडवान्स ट्रायलच्या स्टेजमध्ये आहे. त्या देशाने जर मान्यता दिली तर याच्या इमर्जन्सी ट्रायलसाठी भारतीय आरोग्य मंत्रालयाकडे विनंती करता येऊ शकेल. आरोग्य मंत्रालयाने त्याला मान्यता दिली तर ही चाचणी भारतातही केली जाऊ शकते आणि असे जर झाले तर येत्या डिसेंबरपर्यंत कोरोनाची लस तयार होण्यास काही अडचण नाही.

अदर पूनावाला यांनी वृत्तवाहिन्यांशी संवाद साधताना सांगितले की कोरोना व्हायरसच्या 10 कोटी लसीच्या उत्पादनाची पहिली बॅच ऑक्सफोर्ड कंपनी तयार करत आहे. 2021 सालच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यापर्यंत ती उपलब्ध होऊ शकेल. त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितले की ऑक्सफर्डची लस ही किफायतशीर असेल. ऑक्सफोर्डची लस पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया विकसित करत आहे.

पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट कोरोनावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने ऑक्सफर्डच्या लसीव्यतिरिक्त आणखी काही लसींच्या संशोधनावर काम करत आहे. तसेच स्वत:ची लसही सिरम इन्स्टिट्यूट विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. जगभरात आतापर्यंत 150 पेक्षा जास्त कोरोनाच्या लसींच्या संशोधनाचे काम सुरु आहे. त्यापैकी 38 लसी या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. जगभर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या लसीच्या संशोधनाला वेग आला आहे.