भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे समर्थन


पॅरिस – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर होणाऱ्या व्यक्तीगत टीकेचा भारताने निषेध केला आहे. इस्लाम आणि कट्टरपंथीय विचारधारेबद्दल, मॅक्रॉन यांनी जी भूमिका घेतली त्यावरुन त्यांचा मुस्लिम देशांमध्ये निषेध सुरु आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने समर्थन केले आहे. भारताने मॅक्रॉन यांच्यावर होणारी व्यक्तीगत स्वरुपाची टीका हे आंतरराष्ट्रीय मानकांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

ज्या क्रूर पद्धतीने फ्रेंच शिक्षकाचा शिरच्छेद सार्वजनिक ठिकाणी करण्यात आला, परराष्ट्र मंत्रालयाने त्याचाही निषेध केला आहे. कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही कारणासाठी दहशतवादाचे समर्थन करता येणार नसल्याचेही भारताने पत्रकात म्हटले आहे. जी भूमिका इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी घेतली, त्यावरुन मोठया प्रमाणावर मुस्लिम देशांमध्ये संताप आहे. मॅक्रॉन यांच्याविरोधात निदर्शने सुरु आहेत.

ज्या भाषेमध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर व्यक्तीगत स्वरुपाचे हल्ले करण्यात येत आहेत, आम्ही त्याचा निषेध करतो. काही आंतरराष्ट्रीय मानक आहेत, त्याचे हे उल्लंघन आहे. ज्या क्रूर पद्धतीने फ्रेंच शिक्षकावर दहशतवादी हल्ला करण्याता आला, आम्ही त्याचाही निषेध करतो. या घटनेने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. फ्रान्सची जनता आणि त्या शिक्षकाच्या कुटुंबीयाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

भारत आणि फ्रान्समध्ये द्विपक्षीय संबंध बळकट आहेत. सुरक्षा सहकार्य करारही दोन्ही देशांमध्ये झाले आहेत. फ्रान्सकडून भारताने राफेल ही अत्याधुनिक फायटर विमानेही विकत घेतली आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या या वक्तव्यानंतर भारतातील फ्रान्सच्या राजदूतांनी भारताचे आभार मानले आहेत. दहशतवादाविरोधात दोन्ही देश एकत्र लढा देतील असे म्हटले आहे.