सौदीची ‘पाक’ला चपराक; नकाशातून वगळला वादग्रस्त प्रदेश


लंडन: सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या नकाशातून पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट आणि बाल्टिस्तान हे प्रदेश काढून टाकले आहेत. सौदीकडून भारताला मिळालेली ही दिवाळी भेट असून पाकिस्तानसाठी चपराक आहे.

सौदीने नुकत्याच चलनात आणलेल्या २० रियादच्या नोटेवर जगाचा नकाशा छापला आहे. या नकाशात प्रथम पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट आणि बाल्टिस्तान हे प्रदेश पाकिस्तानात असल्याचे दर्शविण्यात आले होते. मात्र, त्यात सुधारणा करून नंतर हे प्रदेश पाकिस्तानच्या नकाशातून वगळण्यात आले. पुढच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सौदीच्या अध्यक्षतेखाली जी २० समूहाची बैठक होता आहे. या पार्श्वभूमीवर सौदीने पाकिस्तानबाबत बदललेली भूमिका आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची आहे.

पाकिस्तानने काही काळापूर्वी सुधारित राजकीय नकाशा प्रसिद्ध केला. त्यात पाकव्याप्त काशीर, लद्दाखचा काही भाग, गिलगिट, बाल्टिस्तान यासह जुनागढ, सर क्रिक आणि मनवदार हे पाकिस्तानचे भाग असल्याचे दर्शविण्यात आले. यावर भारताच्या परराष्ट्र विभागाने तीव्र नाराजी व्यक्त केली. हे सर्व भूप्रदेश भारताचे अविभाज्य घटक असल्याचे भारताच्या वतीने नमूद करण्यात आले.