भाजपच्या जाहिरनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे विधान


नवी दिल्ली – संपूर्ण जगासह आपला देश अद्यापही कोरोनाच्या विळख्यात आहेत. त्यातच आपल्या देशात अनेक कोरोना प्रतिबंधक लसींच्या चाचण्या सुरु आहेत. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मोठे वक्तव्य केले आहे. देशात जेव्हा कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होईल. तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येईल, असे म्हटले आहे.

पंतप्रधानांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कोरोना प्रतिबंधक लसीवर भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीच्या प्रश्नावर म्हणाले की, देशात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होताच ही लस सर्वांना दिली जाईल. कोणालाही वगळण्यात येणार नसल्याची ग्वाही मी देशाला देतो. वेळोवेळी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आणि लोकांच्या मदतीने बऱ्याच जणांचे जीव वाचले, लॉकडाऊन लागू करण्याचा आणि त्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्याचा कालावधी पूर्णपणे योग्य असल्याचे मोदी म्हणाले.

तसेच अद्यापही कोरोना संकट कायम आहे, लोकांनी अशा परिस्थितीत सावध राहिले पाहिजे. लोकांनी सणांच्या दिवसात अधिक जागरूक असले पाहिजे, कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही. सध्या भारत सरकारकडून लस वितरणाची तयारी केली जात आहे, जेणेकरून संपूर्ण देशामध्ये ही लस वेळ येताच उपलब्ध होऊ शकेल. एका अंदाजानुसार सर्व देशवासीयांना लस देण्यासाठी सरकारने सुरुवातीला ५० हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला ही लस देण्यासाठी ३८५ रुपयांपर्यंत खर्च होईल, असेही सांगण्यात आले आहे.