राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर संतापलेल्या मायावतींचा मोठा निर्णय


लखनौ – बिहार, मध्य प्रदेशनंतर उत्तर प्रदेशामधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेष म्हणजे सध्या उत्तर प्रदेशात विरोधी बाकांवर असलेले मित्र पक्षच आमनेसामने आले आहेत. बसपा उमेदवारांचा अर्ज राज्यसभेच्या जागेसाठी रद्द झाला असून, अखिलेश यादव यांची बसपच्या आमदारांनी भेट घेत बंडखोरीची तयारी दर्शवल्यामुळे संतापलेल्या बसप सुप्रीमो मायावतींनी मोठा निर्णय घेतला आहे.

बसपचे उमेदवार प्रकाश बजाज यांचा राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद झाला. समाजवादी पार्टी रामजी गौतम यांच्याविरूद्ध त्यांनी उमेदवारी दाखल केली होती. पक्षाच्या उमेदवारांचा अर्ज रद्द झाल्यानंतर बसपच्या काही आमदारांनी सपाचे नेते अखिलेश यादव यांची भेट घेतली. मायावती या भेटीवर चांगल्याच संतापल्या. मायावती म्हणाल्या, बसप विधान परिषद निवडणुकीत जशास तसे उत्तर देण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावेल. आम्हाला एकवेळ भाजपला मत देऊ वा इतर पक्षाला, पण समाजवादी पार्टीच्या उमेदवारांचा विधान परिषद निवडणुकीत पराभव करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू. आमच्या सात आमदारांना फोडले. समाजवादी पार्टीला ही गोष्ट महागात पडेल, असा इशारा मायावती यांनी दिला आहे.

पुढील वर्षी जानेवारीमध्ये उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या ११ जागा रिक्त होत आहेत. यातील समाजवादी पार्टीचे सहा जागांवर आमदार आहेत. तर बसपचे दोन व भाजपचे तीन आमदार आहेत. सध्याची स्थिती बघितल्यास या ११ जागापैकी ८ ते ९ जागा भाजप जिंकण्याची शक्यता आहे. कारण भाजपची ताकद जास्त आहे. तर समाजावादी पार्टी एक जागा सहज जिंकू शकते. दुसऱ्या जागेवर समाजवादी पार्टीला अपक्ष उमेदवारांसह इतर पक्षांची मदत घेणे आवश्यक असणार आहे.