मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी नारायण राणेंविरोधात तक्रार दाखल


सोलापूर : सोलापुरात भाजप खासदार नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ‘गांडूळ, पुळचट’ यासारखे शब्द वापरल्याप्रकरणी बार्शी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. बार्शी पोलिसात नारायण राणेंविरोधात शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी तक्रार दिली, त्यावरुन कलम 504, 506 नुसार अदखलपात्र एनसी दाखल करण्यात आली आहे. राणेंनी भाषणातून मुख्यमंत्र्यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाच्या अनुषंगाने भाजप खासदार नारायण राणे यांनी टीका केली. नारायण राणेंनी चॅनेल, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना तुमची मुख्यमंत्री होण्याची लायकी नाही, पुळचट आणि बुद्धू मुख्यमंत्री, गांडूळ, याची लायकी नाही, तसेच मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी शिवीगाळ आणि दमदाटीची भाषा वापरुन सर्वसामान्य आणि शिवसैनिकांचा अपमान केला आहे. शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी बार्शी पोलिसात तक्रार दाखल करुन कारवाई न केल्यास सोमवारी त्यांच्या पुतळ्याचे दहन केले जाईल, असे तक्रारपत्र दिले.

रविवारी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना बेडूक आणि बेडकाची पिल्ले, अशा अप्रत्यक्ष शब्दांत टोले लगावले होते. नारायण राणे यांनी सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या टीकेला प्रत्युत्तर दिले. नारायण राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांचा अक्षरश: अपमान केला.