कौतुक कसले मला तर याची लाज वाटते- नितीन गडकरींनी घेतली झाडाझडती

फोटो साभार न्यूज मिनिट

केंद्रीय परिवहन व रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांचा एक व्हिडीओ चांगलाच खळबळजनक ठरला आहे. नॅशनल हायवे अॅथोरीटी ऑफ इंडियाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने केले त्यावेळी गडकरी यांनी अतिशय कडक शब्दात येथील अधिकारी वर्गाची झाडाझडती घेतली.

गडकरी भाषणाची सुरवात करताना म्हणाले साधारणपणे कोणताही प्रोजेक्ट पूर्ण झाला की संबंधितांचे अभिनंदन केले जाते. पण मला या कार्यक्रमात शुभेच्छा देताना लाज वाटते आहे. एनएचएआयच्या या प्रोजेक्ट साठी ज्यांच्यामुळे विलंब झाला त्या सर्वाना बाहेरचा रस्ता दाखविला पाहिजे. २०० कोटींच्या या इमारतीला पूर्ण व्हायला ९ वर्षे लागली आणि हा प्रकल्प पूर्ण झालेला पाहण्यासाठी दोन सरकारे आणि आठ चेअरमन यावे लागले. २००८ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली, २०११ मध्ये टेंडर दिली गेली आणि काम पूर्ण व्हायला २०२० उजाडले याची खरोखर लाज वाटते.

गडकरी म्हणाले दिल्ली मुंबई हायवेचा १ लाख कोटींचा प्रकल्प आम्ही दोन वर्षात पूर्ण करणार आहोत आणि या २०० कोटीच्या प्रकल्पाला ९ वर्षे लागली. सध्याच्या चेअरमननी हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात दिरंगाई करणाऱ्या सर्व जनरल मॅनेजर्सचे फोटो लावावेत असेही उपरोधाने बोलून गडकरी यांनी निर्णय घ्यायचा नाही, उलट अडचणी निर्माण करायच्या या मानसिकतेवर कोरडे ओढले. १०-१२ वर्षे एकच ठिकाणी चिकटून राहणाऱ्या या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला पाहिजे असेही ते म्हणाले.