इरफान पठाणची अभिनय क्षेत्रात एन्ट्री 

टीम इंडियाचा ऑलराउंडर खेळाडू इरफान पठाण क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यावर आता चित्रपट क्षेत्रात एन्ट्री करत असून तमिळ चित्रपट कोब्रा मधून तो डेब्यू करत आहे. त्याच्या ३६ व्या वाढदिवशी ही घोषणा करण्यात आली होती आणि आता या चित्रपटाचे फर्स्ट लुक पोस्टर रिलीज केले गेले आहे. यात इरफान फ्रेंच इंटरपोल अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून मुख्य भूमिकेत सुपरस्टार चीयान विक्रम आहे. मिळालेल्या माहितीनुसार इरफान यात छोटी भूमिका करणार आहे.

चित्रपटाचे शुटींग भारतात तसेच परदेशात केले जात आहे. चीयान विक्रम यात भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार असून तो २५ विविध गेटअप मध्ये दिसेल. पुढच्या वर्षात हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाला ए.आर. रेहमान यांचे संगीत असून हा अॅक्शन थ्रिलर आहे.

इरफानचे क्रिकेट करियर उत्तम आहे. डावखुरा मध्यमगती गोलंदाज म्हणून टीम इंडिया मध्ये त्याने चांगली कामगिरी बजावली असून अनेकदा टीमच्या विजयात मोठा वाटा उचलला आहे. कॉमेंटेटर म्हणूनही त्याने काम केले आहे. भारतासाठी त्याने २९ कसोटी, १०२ वन डे आणि २४ टी २० खेळल्या आहेत.

यापूर्वीही अनेक क्रिकेटपटू चित्रपटात झळकले असून त्यात सुनील गावस्कर, हरभजनसिंग, कपिल देव, अजय जडेजा, सलील अंकोला, विनोद कांबळी, सय्यद किरमाणी, श्रीसंत यांचा समावेश आहे.