हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये २०२० च्या अखेरपर्यंत तीव्र भूकंप होण्याची वैज्ञानिकांनी वर्तवली शक्यता


नवी दिल्ली – कोरोना या महामारीचा सध्या संपूर्ण जग सामना करत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ढासळलेली अर्थव्यवस्था, कोट्यावधी लोकांवर बेरोजगारीचे संकट त्यातच पगारकपात अशी संकटांची मालिका अद्याप सुरू असल्यामुळे संपूर्ण जगासाठी २०२० हे वर्ष चिंता वाढवणारे ठरले.

अवघे दोन महिने हे वर्ष संपण्यासाठी शिल्लक असली तरीही संकटे काही संपणार नसल्याचा दावा वैज्ञानिकांकडून करण्यात येत आहे. भारतावर या वर्षाच्या अखेरपर्यंत आणखी संकटे येणार असल्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. पूर्ण हिमालय क्षेत्रात लवकरच भूकंपाचे तीव्र धक्के जाणवतील, असा धोक्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यापासून देशाचा हिमालयाच्या पर्वतरांगा बचाव करतात. त्याचबरोबर हिमालयाची शत्रूंपासून देशाचे संरक्षण करण्यातही मोठी भूमिका आहे. पण याच हिमालयामुळे आता देशावर संकट येण्याची शक्यता आहे. हिमालयातील पर्वतांच्या पृष्ठभागासह मातीचे परीक्षण आणि रेडिओकार्बन विश्लेषण वैज्ञानिकांनी केले. वैज्ञानिकांनी भूवैद्यानिक, भौगोलिक माहितीच्या अभ्यासातून भूकंपाचा अंदाज वर्तवला आहे. ‘सिस्मोलॉजिकल रिसर्च लेटर्स जर्नल’मध्ये याबद्दलचा अहवाल प्रकाशित झाला आहे.

पूर्वेला भारत ते पश्चिमेला पाकिस्तानपर्यंत हिमालयीन पर्वतरांगा पसरलेल्या असल्यामुळे भूकंपाचा या संपूर्ण भागावर परिणाम दिसेल. या भागात याआधीही अनेक मोठ्या भूकंपांचा केंद्रबिंदू होता. वैज्ञानिकांचा अंदाज खरा ठरल्यास भारताच्या चंदीगढ, देहरादून आणि नेपाळच्या काठमांडूमध्ये प्रचंड मोठी हानी होईल.