शरद पवारांचे गुणगान करणाऱ्या पंकजा मुंडेंचे रोहित पवारांकडून जाहीर कौतुक


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे दौरे तसेच बैठका कोरोना संकटातही सुरु आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे मंगळवारी राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक पार पडली. ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत शरद पवारांच्या उपस्थितीत या बैठकीत यशस्वी तोडगा काढण्यात आला. भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील या बैठकीला उपस्थित होत्या. पंकजा मुंडे यांनी यानंतर ट्विट करत शरद पवारांच्या कार्याला सलाम केला होता. रोहित पवार यांनी त्यांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे.


पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये @PawarSpeaks hats off … कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले … पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले असल्याचे म्हटले होते.


रोहित पवार यांनी पंकजा मुंडेंच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना एकाप्रकारे विरोधी नेत्यांना टोला लगावला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा.

ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा काढत कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा बैठकीला उपस्थित होते.

Loading RSS Feed