आरबीआयचे सर्व बँकांना व्याजावर व्याजमाफीची योजना 5 नोव्हेंबरपर्यंत लागू करण्याचे निर्देश


मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व कर्जदाता संस्थांना दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी नुकतीच जाहीर व्याजमाफी योजना येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत लागू करण्यास सांगितले आहे. २ कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या व्याजावरील व्याज या योजनेअंतर्गत १ मार्च २०२० पासून सहा महिन्यांसाठी माफ केले जाणार आहे.

पात्र कर्ज खात्यांसाठी सरकारने चक्रवाढ व्याज व साधारण व्याजामधील फरकाच्या पेमेंटवर अनुदानाची योजना २३ ऑक्टोबरला जाहीर केली होती. सर्व बँकांना ५ नोव्हेंबरपर्यंत चक्रवाढ व्याज व साधारण व्याजातील फरक कर्जधारकांच्या खात्यात जमा करण्यास सरकारने सांगितले होते.

केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, मोरॅटोरियम योजनेत २ कोटींपर्यंतचे कर्ज घेणाऱ्यांसाठी व्याजावर व्याज आणि सामान्य व्याजातील फरकाची रक्कम ५ नोव्हेंबरपर्यंत खात्यात जमा होईल. केंद्र सरकारकडून बँका ही रक्कम घेतील. त्याचबरोबर आपल्या शपथपत्रात केंद्राने न्यायालयाला सांगितले की, ही योजना अर्थ मंत्रालयाने आणली आहे.