कॅम्पस् इन्टरव्ह्यूची तयारी


सध्या काही विशिष्ट अभ्यासक्रमांना तरी भरपूर मागणी आहे. त्यामुळे मुलांना नोकर्‍या शोधाव्या लागत नाहीत, उलट नोकर्‍याच मुलांना शोधत कॉलेजपर्यंत येतात. अर्थात हे एक विशिष्ट परिस्थिती आहे आणि त्यामुळे आपल्याला आपोआपच नोकरी लागेल, अशा कल्पनेत अनेक मुले कॅम्पस इन्टरव्ह्यूची तयारीच करीत नाहीत. अशा प्रकारचे इन्टरव्ह्यू घेणार्‍या कंपन्या मात्र कॉलेजेस्मध्ये येऊन उत्तम गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन जातात. ही उत्तम गुणवत्तेची मुले म्हणजे कोण असतात? तर ती असतात उत्तम तयारी करणारी मुले. जी मुले किंवा मुली आपल्या स्वत:च्या अभ्यासाबरोबरच कॅम्पस इन्टरव्ह्यूसाठीही वेगळी तयारी करतात. त्यांनाच त्या इन्टरव्ह्यूचे तंत्र जमते आणि ही मुले उचलली जातात.

कंपन्यांना एक सोय असते. त्यांना शेकडो विद्यार्थ्यांतून दहा किंवा वीस मुले किंवा मुली निवडायच्या असतात. त्याअर्थाने त्यांना चॉईस मोठा असतो आणि खरोखरच जी मुले चमकतात त्यांना ते प्राधान्य देतात. अतीशय अल्प वेळात मुलांची निवड होत असते. त्यामुळे इन्टरव्ह्यूच्या पहिल्या काही क्षणात ज्या मुलांचा प्रभाव पडतो त्यांची निवड सोपी जाते. म्हणून कॅम्पस इन्टरव्ह्यूमधून नोकरी मिळवू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी या इन्टरव्ह्यूच्या तंत्राचा विचार केला पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. इन्टरव्ह्यूच्या पहिल्या काही क्षणांमध्ये स्वत:चा परिचय आकर्षकपणे करून देणे गरजेचे असते. त्याचा सराव मुलांनी केला पाहिजे. स्वत:चा आकर्षक इंग्रजी भाषेमध्ये परिचय करून दिला पाहिजे. अशा प्रकारच्या इन्टरव्ह्यूत दुसरा क्षण महत्वाचा असतो आणि तो असतो संबंधित विषयाच्या बेसीक संकल्पना समजल्या आहेत की नाही हे तपासण्याचा. निव्वळ घोकंमपट्टी करून पास झालेल्या मुला-मुलींना या परीक्षेत शून्य मार्क मिळतात. तेव्हा केवळ इन्टरव्ह्यूसाठी म्हणून नव्हे तर जीवनात यशस्वी होण्यासाठी सुद्धा बेसीक कल्पना स्पष्ट झालेल्या असणे आवश्यक असते. कॅम्पस इन्टरव्ह्यूच्या संबंधात काही समज आणि गैरसमज आहेत.

एखादे महाविद्यालय आपली जाहिरात करते तेव्हा शंभर टक्के जॉब गॅरंटी अशी घोषणा करत असते. म्हणजे त्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास त्यातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यास नक्की नोकरी मिळणार, अशी खात्री त्या संस्थेने आपल्या जाहिरातीतून दिलेले असते. याचा अर्थ लोकांच्या लक्षात येत नाही. भरपूर ऍडमिशन मिळविण्याच्या घाईमध्ये महाविद्यालये सुद्धा त्याचा अर्थ स्पष्ट करत नाहीत. मात्र ऍडमिशन घेणार्‍या मुलांना असे वाटते की, नोकरी देणे ही संस्थेची जबाबदारी आहे. खरे म्हणजे तशी काही जबाबदारी संस्था स्वीकारत नाही. मात्र ती संस्थेची जबाबदारी आहे असा समज करून घेणारे विद्यार्थी कॅम्पस इन्टरव्ह्यूची तयारी न करताच इन्टरव्ह्यूला जातात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाविद्यालयांमधून शक्यतो इन्टरव्ह्यूची तयारी सुद्धा करून घेतली जात नाही. ती स्वत: उमेदवारालाच करावी लागते.

सध्याच्या काळात नोकर्‍या भरपूर आणि उमेदवार कमी अशी स्थिती असल्याचे दिसते. परंतु तसे आहे म्हणून कोणालाही नोकर्‍या मिळतील असे समजण्याचे काही कारण नाही. खाजगी कंपन्यांमध्ये एक वेळ एखादी जागा मोकळी ठेवली जाते, परंतु जागा मोकळी असून उमेदवार मिळत नाही म्हणून मिळेल तसला अपात्र उमेदवार नेमला जात नाही. तेव्हा डिमांड आहे म्हणून विद्यार्थ्यांनी बेसावध राहता कामा नये. कॅम्पस इन्टरव्ह्यूमध्ये काय विचारले जाते याची बारकाईने चौकशी करून उत्तम पूर्वतयारी करून आत्मविश्‍वासाने त्या इन्टरव्ह्यूला सामोरे गेले पाहिजे. अवघडात अवघड इन्टरव्ह्यू कसा असेल याचा विचार करावा आणि आपल्याला अशा इन्टरव्ह्यूला सामोरे जायचे आहे असे मानून त्यादृष्टीने तयारी करावी. म्हणजे सोपा इन्टरव्ह्यू सुद्धा आपल्याला सोपा जाईल.

Leave a Comment