कंगना विरोधातील खटल्यावर मुंबई महापालिकेने खर्च केले 82 लाख


मुंबई : मुंबई महानगरपालिकेने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत विरोधातील खटल्यावर आतापर्यंत तब्बल 82 लाख 50 हजार रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंगना राणावतच्या वांद्रे पाली हिल येथील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या एच पश्चिम विभागीय कार्यालयाने कारवाई केली होती. याप्रकरणी कंगना राणावतने उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती.

मुंबई महापालिकेने याप्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी आतापर्यंत तब्बल 82 लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती पालिकेने माहिती अधिकारात दिली आहे. वांद्रे पाली हिल येथील आपल्या घरात अभिनेत्री कंगनाने माणिकर्णिका फिल्म्सचे कार्यालय सुरु केले होते. कंगनाने या कार्यालयात बेकायदेशीर बांधकाम केले होते. कंगनाने याच दरम्यान मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केली. त्याचे मुंबईत पडसाद उमटले होते. कंगनाला बेकायदेशीर बांधकाम केल्या प्रकरणी 354 कलमान्वये मुंबई महापालिकेने नोटीस दिली होती. या नोटीसीला योग्य उत्तर दिले नसल्याने पालिकेने कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम तोडले होते.

कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम तोडले जात असताना कंगनाच्या वकिलाने उच्च न्यायालयात आपण दाद मागितली असल्याचे निदर्शनास आणल्यावर तोडकाम थांबण्यात आले होते. उच्च न्यायालयाने कंगनाच्या बेकायदेशीर काम तोडण्यास स्थगिती दिली आहे. मुंबई महापालिकेने या प्रकरणी कोणत्या वकिलाची नियुक्ती केली आणि त्यांना किती रक्कम अदा करण्यात आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शरद यादव यांनी मागितली होती.

याबाबत माहिती देताना उच्च न्यायालयात या प्रकरणी पालिकेची मांडण्यासाठी अस्पि चिनॉय यांची वकील म्हणून नियुक्ती केली आहे. पालिकेने त्यांना 22 सप्टेंबर रोजी 3 वेळा 7 लाख 50 हजार तर 7 ऑक्टोबर 8 वेळा 7 लाख 50 हजार रुपये असे एकूण 82 लाख 50 हजार रुपये फी म्हणून अदा केल्याची माहिती पालिकेच्या कायदा विभागाने दिली आहे.