मराठीबद्दल तिरस्कार व्यक्त करणाऱ्या कुमार सानूंच्या मुलाविरोधात मनसे आक्रमक


मुंबई : यापूर्वीच्या सिझनप्रमाणेच सध्या बिग बॉसच्या चौदाव्या सीझनमध्ये वादग्रस्त वक्तव्यांना सुरुवात झाली आहे. त्यातच सध्याच्या घडीला गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोली यांच्या वादाची चर्चा सुरू आहे. पण जान कुमार सानूला या त्रिकुटाचा वाद अडचणीत आणणारा ठरू शकतो. निक्की आणि राहुलशी वाद घालताना त्याने मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्याचा महाराष्ट्रातील अनेकांनी निषेध केला आहे. केवळ मराठी कलाकारांनीच नव्हे तर राजकीय पक्षांनी देखील जान कुमार सानूला लक्ष्य केले आहे.


कुमार सानूंच्या या मुलाला खास मनसे शैलीत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी धारेवर धरले आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत असे म्हटले की, जान कुमार सानू. मराठी भाषेची याला चीड येते म्हणे.अरे तू कीड आहेस मोठी. मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला.


त्याचबरोबर त्यांनी आणखी एक ट्विट करत जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे. मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी.लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं. असे त्यांनी म्हटले आहे.


दरम्यान या प्रकरणी शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील, Big Boss मालिकेचे शूटिंग महाराष्ट्रात होते, मराठी लोकांमुळे TRP वाढतो त्याच महाराष्ट्राच्या मराठीचा अवमान मालिकेतल्या जान कुमार सानूने केला हे कदापि खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात करियर घडवलेल्या गायक कुमार सानुचा मुलगा मराठीचा द्वेष व अनादर करत असेल तर हे सहन केले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.